धवल कुलकर्णी

करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सध्या सुरू असलेली टाळेबंदी उठवली तरीही लगेच सारं काही आलबेल होईल असं नाही. ज्यावेळी लॉकडाउन उठवण्यात येईल त्यानंतर साधारणतः महिनाभर तरी राज्यातल्या प्रभावित ठिकाणी जमावबंदी लागू असेल आणि लोकांच्या मुक्त संचारावरही बंधने येतील अशी चिन्हं आहेत.

याबाबत सरकार मधील उच्चपदस्थ सूत्रांनी लोकसत्ता डॉट कॉम ला माहिती दिली. या सूत्रांच्या म्हणण्यानुसार टाळेबंदी वाढणार अशी चिन्हं आहेत. अर्थात तसे करणे हे सध्याच्या परिस्थितीशी सुसंगतच आहे. ही बंदी उठवल्यावर साधारणपणे महिनाभर का होईना लोकांच्या मुक्त संचारवर वर बंधन ठेवावी लागतील असे ते म्हणाले.

त्याच्यामुळे कदाचित महिनाभर का होईना पण राज्यात संचारबंदी लागू असेल. यादरम्यान उपहारगृहे, मॉल, आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवर बंधनं असतील. लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी करु नये यासाठी घेण्यात आलेली ही खबरदारी असणार आहे. करोनाचा धोका अदयाप टळलेला नाही. त्यामुळे या कालावधीत घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर इतक्याच परिघात लोकांना वावरावं लागेल.

या सूत्राच्या म्हणण्यानुसार अन्य राज्यातले महाराष्ट्रात काम करणारे मजूर टाळेबंदीची चाहूल लागल्यावर आपापल्या राज्यांमध्ये निघून गेले आहेत. हे लोक महाराष्ट्रात कधी परत येतात यावर बांधकाम व वस्त्रोद्योगासारख्या क्षेत्रांचे भवितव्य अवलंबून आहे. टाळेबंदीनंतर येऊ घातलेल्या आर्थिक संकाटाला सामोरे जाणे हे कठीण होणार आहे. त्याच वेळेला कायदा व सुव्यवस्था ढासळू नये यासाठीसुद्धा पोलीस व अन्य यंत्रणांना कायम सतर्क राहावे लागणार आहे.