News Flash

सातपाटी खाडीत गाळ कायम

सातपाटी खाडीमध्ये २००४ पासून गाळ साचण्यास सुरुवात झाली.

|| नीरज राऊत

मासेमारी करणाऱ्या बोटींना अडथळे; गाळ काढण्यासाठी शासनाकडून अद्याप निधी नाही

पालघर : पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीकरिता प्रसिद्ध असलेल्या सातपाटी येथील मासेमारी बंदरालगतच्या खाडीमध्ये साचलेल्या गाळाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकीच्या काळात ही समस्या सोडवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आश्वासने दिली जात असली तरीही प्रत्यक्षपणे गाळ काढण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.  शासनाकडून यासाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

सातपाटी खाडीमध्ये २००४ पासून गाळ साचण्यास सुरुवात झाली. सातपाटी व मुरबे येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेटीच्या सदोष रचना, खाडीमध्ये एका ठिकाणी खडकाचा भराव टाकून अस्तित्वात असलेल्या छोटा बंधाऱ्याची उंची वाढल्याने तसेच खाडीपात्रात गाळ साचल्याने खाडीतील पाण्याचा प्रवाहामध्ये बदल झाला. परिणामी हा खाडीतील नौकानयन मार्गावर गाळ बसण्याची प्रक्रिया झपाटय़ाने वाढली. अरुंदी झालेल्या या नौकानयन मार्गामधून कालांतराने सातपाटी खाडी फक्त मोठय़ा भरतीच्या वेळी (उधाण) नौकानयन मार्ग सुरू राहत असल्याने येथील मासेमारी बोटी कमी उंचीच्या भरतीच्या काळात बंदरामध्ये मार्गक्रमण करू शकत नाही. त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे.

२०१५-१६च्या सुमारास खाडीत साचलेला गाळ काढण्यासाठी १३ कोटी रुपयांच्या निविदा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मंजूर केली होती. खाडीमधील गाळ काढून तो समुद्रावर दहा किलोमीटर दूर अंतरावर टाकण्याचे या निविदेतील कामामध्ये अपेक्षित होते. संबंधित ठेकेदाराने सातपाटी बंदरात प्रवेश करण्याच्या ठिकाणापासून गाळ काढण्याची तयारी सुरू केली असताना गावकऱ्यांनी खाडीपात्रातून गाळ करण्यास आरंभ करावा, असा अट्टहास धरल्याने हे काम प्रलंबित राहिले. या कामी ठेकेदाराने खाडीपात्रात आणलेल्या ड्रेझरने वर्षभराच्या काळात फक्त दोन वेळा रेतीचा उपसा करू शकला. हे काम करण्यास खाडीपात्रांमध्ये अपेक्षित पाण्याची पातळी मिळत असल्याचे कारण सांगून या कामी ठेकेदाराला दिलेला दोन कोटी ७० लाख रुपयांचा निधी वाया गेला, असे येथील मच्छीमारांचे मत आहे.

सध्या सातपाटी खाडीतील सुमारे तीन लाख घनमीटर गाळ साचला असून या गाळाचा उपसा करून दूर समुद्रात फेकण्यासाठी तसेच नौकानयन मार्ग खुला करण्यासाठी ३१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी निधीच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे शासकीय विभागांकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

अहवाल तयार, कामास विलंब

पावसाळ्यात असलेल्या मासेमारीच्या बंदीच्या काळानंतर खाडीत जमणारा गाळ काढण्यासाठी तसेच बोटींना निदान भरतीच्या काळात सोयीस्कररीत्या बंदरामध्ये ये-जा करण्यासाठी सातपाटीमधील दोन्ही सहकारी मच्छीमार संस्था सुमारे २० लाख रुपये खर्च करून तात्पुरत्या स्वरूपात हा साचलेला गाळ बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात. या गाळाची वाहतूक करण्यासाठी ‘रॉयल्टी’ची गरज असून या गाळात कमी प्रमाणात रेती असल्याने जलयुक्त शिवार योजनेप्रमाणे या गाळाचा उपसा करून वाहतूक करण्यास नाममात्र रॉयल्टीची आकारणी करण्याची मागणी मच्छीमार संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या कामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, पालघर तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधींनी खाडीपात्रातील साचलेल्या गाळाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालावर शासनविचार करून याबाबत निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कृतीला आरंभ होऊ  शकणार आहे.

गाळाचा तपशील

सातपाटी खाडीमध्ये साचलेला गाळ हा कस्टम जेटी ते दांडा खाडी असा सुमारे एक किलोमीटर लांब आणि १०० मीटर रुंद असा पट्टा असून त्याची खोली किमान तीन मीटर असल्याचे येथील तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:25 am

Web Title: there is still no funding from the government to remove the silt akp 94
Next Stories
1 ‘टॅलेंट सर्च’ परीक्षेत सदोष प्रश्नपत्रिका
2 नवनगर भागात लूटमारीच्या घटना
3 देशात बिघडलेल्या वातावरणाला समाजच जबाबदार-मोहन भागवत
Just Now!
X