राज्यातील लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

याचबरोबर उद्यापासून दुकानं उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज किंवा उद्या निर्णय होईल, अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षांचे नेते विरोधी पक्षनेते व महाविकासआघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

निर्बंध शिथिल की अधिक कडक?

करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.