देशात १८ व्या स्थानावर झेप,‘टॉप’ केंद्रात समावेश

केंद्रीय विद्युत प्राधिकारण (सीइए) ने एप्रिल २०१६ च्या कामगिरीच्या आधारावर देशभरातील विद्युत केंद्रांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत अकोला जिल्ह्य़ातील पारस औष्णिक विद्युत केंद्राने १८ व्या स्थानावर गरूड झेप घेतली आहे. परिणामी, मे २०१३ मधील पारस वीज केंद्राचा यापूर्वीचा महत्तम वीज उत्पादनाचा व भारांकाचा विक्रम मोडीत निघाला आहे.

दर्जाहीन कोळशामुळे विजनिर्मितीवर विपरीत परिणाम होत असल्याने देशात विजटंचाई असताना पारस औष्णिक विद्युत केंद्रात काही महिन्यांपासून सातत्याने विजनिर्मिती करण्यात आली. यापूर्वी मे २०१३ मध्ये ९०.९ टक्के इतका पीएलएफ (प्लान्ट लोड फॅक्टर) होते. या केंद्रात २५० मेगावॉटचे दोन संच कार्यान्वित असून, ५०० मेगावॅट विजनिर्मिती करण्याची केंद्राची क्षमता आहे. यानुसार रोज १२ दशलक्ष युनिट विजनिर्मिती होणे अपेक्षित असते. पारस केंद्राने मे २०१३ मध्ये रोज ९०.९ टक्के विजनिर्मिती केल्याने पारस प्रकल्प त्यावेळी देशात १७ व्या स्थानावर होता. त्यानंतर आता एप्रिल २०१६ या महिन्यात वीज उत्पादनाचा सर्वोच्च उच्चांक गाठला. या केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ३ ने १७४.८९७ दशलक्ष युनिट विजनिर्मिती आणि ९७.१५५ टक्के भारांक, तर २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ४ ने १७५. ७६९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती आणि ८७.७६९ टक्के भारांक गाठला आहे. यामुळे देशातील विविध केंद्रांमधील गत वर्षभरातील भारांकामध्ये पारस वीज केंद्र १८ व्या स्थानावर असून, महानिर्मितीच्या विविध वीज केंद्रातील महत्तम भारांकामध्ये प्रथम स्थानावर आहे.

पारस विद्युत केंद्राने अशा प्रकारची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा, वीज नियामक आयोगाचे निकष, स्वच्छ आणि स्वस्त वीज उत्पादनाचे ध्येय गाठण्यासाठी महानिर्मिती मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी नियोजनबद्ध पावले उचलली. यात प्रामुख्याने जास्त उष्मांकाच्या कोळशाचा वापर, कोल मिल्सचे संयोजन, बाष्पक टर्बाइन भागातील देखभाल-दुरुस्तीची कामे, संयंत्रांची पूर्ण उपलब्धता, दैनंदिन कामात सुधारणा, वीजनिर्मितीला परिणामकारक ठरणाऱ्या तांत्रिक बाबींवर बारकाईने लक्ष दिले. अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांमुळे पारस वीज केंद्राने नव्या विक्रमाला गवसणी घातल्याचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी सांगितले.