19 February 2019

News Flash

थर्माकोलच्या मखरांचा बाजार उठला!

गणेशोत्सव काळात घरगुती गणेशांच्या सजावटीसाठी थर्माकोलच्या मखरांची मोठी मागणी असायची.

कागदी मखर, फुलांच्या सजावटींना मोठी मागणी

अलिबाग : थर्माकोल आणि प्लास्टीकवर आलेल्या बंदी मुळे यंदा थर्माकोल मखरांचा बाजार पुरता उठला आहे. बाजारातून थर्माकोल मखर हद्दपार झाल्याने यावर्षी कागदी मखर आणि खोट्या फुलांच्या सजावटींना मोठी मागणी होतांना दिसत आहे.

गणेशोत्सव काळात घरगुती गणेशांच्या सजावटीसाठी थर्माकोलच्या मखरांची मोठी मागणी असायची. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत होती. बाजारात अडीच हजार रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंत ही थर्माकोलची मखर हातोहात विकली जात असत. राज्यसरकारने थर्माकोल आणि प्लास्टीकच्या उत्पादन आणि विक्रीवर र्निबध घातल्याने यावर्षी मात्र थर्माकोल मखरांचा बाजार पुरता उठला आहे. यामुळे अनेक मखर उत्पादकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे.  मात्र काही मखर उत्पादकांनी थर्माकोल बंदीनंतर कागद आणि पुठ्ठय़ापासून तयार केलेली मखरे बाजारात आणली आहेत. डिजीटल पिंट्रीगच्या साह्याने तयार केलेली हि मखर सध्या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. तर पुढ्यापासून तयार झालेल्या आणि कापड लाऊन त्यावर नक्षीकाम केलेल्या मखरांनाही चांगली मागणी होत आहे. ही मखरे तीन हजारा पासून ते सात हजार रुपयांपर्यंत विकली जात आहेत. खोटय़ा फुलांच्या सजावटीकडे ग्राहकांनी मोर्चा वळवला आहे. निरनिराळ्या प्रकारच्या फुले वापरून तयार केलेली सजावट सध्या एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात आहेत.

थर्माकोल बंदीमुळे मखर कारागिरांनाही कशा प्रकारचे मखर बनवायचे हा प्रश्न पडला होता. यावर कारागिरांनी मालाचे पुठ्ठे, जाड कागद, कापडी पडदे यापासून आकर्षक मखर तयार केली आहेत. याची किंमत २ हजारापासून ५ हजारपर्यत आहेत. तसेच ग्राहकांच्या आवडी   निवडीनुसारही मखर बनवून दिली जात आहेत.’

आकाश रुडे, मखर विक्रेता

First Published on September 12, 2018 12:55 am

Web Title: thermocol ganesh makhar disappear from market due to ban