थिबा संगीत महोत्सव

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंच गाजवलेल्या कलाकारांच्या कलेची मेजवानी येथील थिबा राजवाडय़ाच्या प्रांगणात रत्नागिरीकरांना देणाऱ्या आर्ट सर्कलतर्फे यंदाच्या कला महोत्सवात या दिग्गजांच्या पुढच्या पिढीचे कलादर्शन रसिकांना घडणार आहे.

आर्ट सर्कलच्या कार्यकर्त्यांनी गेली आठ वर्षे चिकाटीने प्रयत्न करून रत्नागिरीत जागतिक दर्जाच्या कलाकारांच्या कलाविष्काराचा आनंद देणारा हा महोत्सव उत्तम प्रकारे रुजवला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या या महोत्सवात आत्तापर्यंत मालिनी राजूरकर, राजन-साजन मिश्रा, रशीद खान, अजय चक्रवर्ती, ख्यातनाम व्हायोलीनवादक एम. राजम यांच्यासह तीन पिढय़ा, हरिप्रसाद चौरसिया इत्यादींनी हजेरी लावली असून संगीताच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर या महोत्सवाची दखल घेतली गेली आहे. येत्या २२ ते २४ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात यंदा आयोजकांनी अशा ख्यातकीर्त कलाकारांच्या पुढच्या पिढय़ांना निमंत्रित करून त्यांच्या कलाविष्काराचे दर्शन रत्नागिरीकरांना घडवण्यात येणार आहे. यामध्ये महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२२ जानेवारी) ख्यातनाम संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव राहुल यांचे संतूरवादन होणार असून प्रसिद्ध तबलावादक रामदास पळसुले त्यांना साथ करणार आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीताचा सुंदर मेळ साधत राहुल यांनी संतूरवादनात प्रयोग केले आहेत. पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे शास्त्रीय गायन दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण असून त्यानंतर सतारवादक कार्तिककुमार यांचे चिरंजीव नीलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाचाही कार्यक्रम होणार आहे. ते या घराण्याच्या सहाव्या पिढीतील वादक असून त्यांचाही प्रवास अभिजात शास्त्रीय संगीतवादन ते स्वनिर्मित ‘इलेक्ट्रिक गिटार’ असा राहिला आहे.

कथ्थक नृत्याचे प्रणेते पं. गोपीकृष्ण यांचा पुतण्या विशालकृष्ण यांच्या नृत्याने महोत्सवाच्या अखेरच्या दिवसाच्या (२४ जानेवारी) कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. गेल्या अकरा पिढय़ा संगीताचा वारसा चालवणाऱ्या सुखदेवमहाराज यांच्या घराण्यातील ते वंशज असून कथ्थक नृत्यकलाकार सितारादेवी यांचे शिष्य आहेत. ‘गाणारे सौंदर्य’ असे वर्णन केले जाणाऱ्या कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. पं. अजय चक्रवर्ती यांच्या कन्या असलेल्या कौशिकी यांना सत्यजित तळवलकर आणि अजय जोगळेकर संगीतसाथ करणार आहेत.