संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंतांच्या पुढच्या पिढीचा कलाविष्कार

रत्नागिरी शहराच्या सांस्कृतिक जीवनाचे अंग बनलेल्या थिबा संगीत महोत्सवाला आज (२२ जानेवारी) प्रारंभ होत आहे. भारतीय संगीताच्या क्षेत्रातील दिग्गज कलावंतांच्या पुढच्या पिढीचा कलाविष्कार हे यंदाच्या महोत्सवाचे खास वैशिष्टय़ आहे.

येथील थिबा राजवाडय़ाच्या प्रांगणात आर्ट सर्कलतर्फे आयोजित यंदाच्या कला महोत्सवाचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते संध्याकाळी सात वाजता होणार आहे. त्यानंतर येत्या २४ जानेवारीपर्यंत रोज संध्याकाळी राहुल शर्मा (संतूर), अंकिता जोशी (शास्त्रीय गायन), निलाद्री कुमार (सतार वादन), कौशिकी चक्रवर्ती (शास्त्रीय गायन) आदी नव्या दमाचे आश्वासक कलाकार गायन-वादन सादर करणार आहेत.

आर्ट सर्कलच्या कार्यकर्त्यांनी गेली आठ वर्षे चिकाटीने प्रयत्न करून रत्नागिरीत जागतिक दर्जाच्या कलाकारांच्या कलाविष्काराचा आनंद देणारा हा महोत्सव उत्तम प्रकारे रुजवला आहे. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या या महोत्सवाची संगीताच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर  दखल घेतली गेली आहे.

यंदाच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२२ जानेवारी) ख्यातनाम संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव राहुल यांचे संतूरवादन होणार असून, प्रसिद्ध तबलावादक रामदास पळसुले त्यांना साथ करणार आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय आणि पाश्चात्त्य संगीताचा सुंदर मेळ साधत राहुल यांनी संतूरवादनात प्रयोग केले आहेत. पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे शास्त्रीय गायन दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण असून, त्यानंतर सतारवादक कार्तिककुमार यांचे चिरंजीव नीलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाचाही कार्यक्रम होणार आहे. ते या घराण्याच्या सहाव्या पिढीतील वादक असून, त्यांचाही प्रवास अभिजात शास्त्रीय संगीतवादन ते स्वनिर्मित  ‘इलेक्ट्रिक झिटार’ असा राहिला आहे.

कथ्थक नृत्याचे प्रणेते पं. गोपीकृष्ण यांचा पुतण्या विशालकृष्ण यांच्या नृत्याने महोत्सवाच्या अखेरच्या दिवसाच्या (२४ जानेवारी) कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. गेल्या अकरा पिढय़ा संगीताचा वारसा चालवणाऱ्या सुखदेवमहाराज यांच्या घराण्यातील ते वंशज असून कथ्थक नृत्यकलाकार सितारादेवी यांचे शिष्य आहेत.

‘गाणारे सौंदर्य’ असे वर्णन केले जाणाऱ्या कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. पं. अजय चक्रवर्ती यांच्या कन्या असलेल्या कौशिकी यांना सत्यजित तळवलकर आणि अजय जोगळेकर संगीतसाथ करणार आहेत.