बार्शी येथे युनियन बँकेच्या शाखेसमोर महावीर चांदमल कुंकूलोळ यांची चार लाख ३५ हजारांची रोकड असलेली बॅग चोरटय़ांनी हिसका मारून पळवून नेली. बार्शी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
कुंकूलोळ हे युनियन बँकेत त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बँकेत गेले होते. बँकेतून रक्कम काढून घराकडे परत निघाले असताना रक्कम असलेली कापडी पिशवी त्यांनी मोटारसायकलला लावली होती. तेथून निघत असताना अचानकपणे मोबाइलवर कॉल आल्याने त्यांनी खिशातून मोबाइल काढला असता गाडीची चावी खाली पडली. ती उचलून घेण्यासाठी कुंकूलोळ हे खाली वाकले असता तेवढय़ा वेळात संधी साधून चोरटय़ाने कुंकूलोळ यांच्या ताब्यातील पैशांची बॅग हिसका मारून पळवून नेली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद झाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस करीत आहेत.