टाळेबंदीत शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असतांनाही चोरटय़ांनी कंपन्यांसह बँकांचे एटीएम फोडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री देवपूर भागातील एक एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न झाला. तर शिरपूरमधील गोल्ड रिफायनरी कंपनीतून दीड लाखांचे साहित्य चोरीस गेले. या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देवपूर येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालय परिसरातील नंदिनी कॉम्प्लेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. चोरटय़ांनी या एटीएम यंत्राचे शटर तोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. यामुळे चोरटय़ांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान, चोरटय़ांनी यंत्राला स्पर्श करताच बँकेच्या मुख्य कार्यालयात भोंगा वाजला. बँक अधिकाऱ्यांनी तत्काळ देवपूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी क्षेत्र व्यवस्थापक मोहित सनेर यांची दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरीकडे, मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर गोल्ड रिफायनरी कंपनीच्या आवारातून चोरटय़ांनी दीड लाखांचे साहित्य लंपास केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिफायनरीचे व्यवस्थापक योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, १० एप्रिलच्या रात्री दहिवद शिवारातील कंपनी आवारात चोरटय़ांनी प्रवेश केला. मागील दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून जनरेटर खोलीतील ६६ हजारांची वायर, ३६ हजारांच्या कॉपर प्लेट, २४ हजाराची बॅटरी, १२ हजार ५०० रूपये किंमतीचा संगणक, सहा हजार रूपयांचा प्रिंटर असा एकूण एक लाख ४४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.