एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड पळवल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवल्याची घटना समोर आली आहे. नगर एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र बँकेचं एटीएम मशीन चोरट्यांनी पळवलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरीची घटना कैद झाली आहे.

चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम घेऊन पोबारा केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण बुधवारी रात्री नगर एमआयडीसीतील एटीएम मशीनच चोरट्यांनी लांबवले आहे. एमआयडीसीतील सह्याद्री चौकाजवळ महाराष्ट्र बँकेचे एटीएम होते. तेथे सुरक्षा रक्षकही नव्हता. ही संधी साधून चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवले. या मशीनमध्ये अडीच लाखांची रोकड होती. चोरट्यांनी सुरुवातीला एटीएम मशीनजवळ लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर एटीएम मशीन पळवलं. दुसऱ्या दिवशी एटीएम मशीन गायब झाल्याचं बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी एटीएम मशीनजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली होती. पण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. एटीएम मशीन कुणी एकटा-दुकटा उचलू शकत नाही. हे काम तीन ते चार चोरट्यांचे असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.