प्रसिद्ध लेखक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असेलेले पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या घटनेनंतर तब्बल सहा महिन्यांनी चोर पोलिसांच्या हाती लागला आहे. पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीतील डिसेंबर महिन्यात चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून पोलीस चोराचा शोध घेत होते.

जितसिंग राजसिंग टाक (वय २४, रा. बिराजदार नगर, वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या घरीही नुकतीच चोरी झाली. हा गुन्हा उघडकीस आणत असताना पु.ल. यांच्या घरात चोरी करणारा जितसिंग पोलिसांच्या हाती लागला. टाक याने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने पु.ल.देशपांडे यांच्या घरी चोरी केली होती. त्यापैकी एकजण आधी केलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी कारागृहात आहे. तर बाकी दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पु. ल. देशपांडे यांचे घर आहे. पहाटेच्या सुमारास ७ ते ८ चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून पु. ल. देशपांडेंच्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व सामानांची उलथापालथ केली. पण घरात किमती ऐवज नव्हता. पुलंनी लिहिलेली काही हस्तलिखिते व पुस्तकेच फ्लॅटमध्ये होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या इमारतीतील या फ्लॅटशिवाय आणखी तीन फ्लॅटही फोडण्यात आले. ही गोष्ट शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुलंच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पुलंच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, चार वर्षांपूर्वीही पुलंच्या घरात चोर घुसले होते. मात्र तेव्हाही त्यांच्या हाती काही लागले नव्हते. कारण पुलंच्या घरातील सर्व कपाटं केवळ पुस्तकं आणि हस्तलिखितांनीच भरली आहेत, अशी माहितीही पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी दिली.