करोनाच्या काळात आपले पोलीस फ्रंटलाइनवर लढले. जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच आहे असं म्हणत मुंबई पोलिसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. एवढंच नाही तर करोनाच्या काळात आपण लॉकडाउन केलं, निर्बंध लादले, वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर? क्षणभर विचार केला पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं? पण तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाइनवर काम करत होते म्हणूनच करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली. करोनासोबतच्या लढ्यात अनेक पोलीस शहीद झाले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःखही व्यक्त केलं.

पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली
पोलिसांचं कर्तृत्व हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पोलिसांचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे कुणी कितीही आदळआपट केली तरीही त्यावर डाग लावू शकणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तुम्ही दक्ष राहून काळजी घेता, जबाबदारी घेता त्यामुळे आम्ही आमचे सण साजरे करतो. त्यासाठी तुमचे धन्यवाद असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात”

पोलीस सतत ताण-तणावात असतात. नव वर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी या जाणिवेतून मी महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सर्व पोलिसांना मी हे सांगतो आहे की तुम्हा सर्वांना फक्त हेच वर्ष नाही तर येणारी अनेक वर्षे सुखाची, समधानाची, भरभराटाची आणि ताणमुक्ततेची जावोत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.