करोनाच्या टाळेबंदीत व्यवसाय बुडाल्याने आणि खासगी सावकार तथा बँकेच्या कर्जाचा डोंगर झाल्याने, चंद्रपूर येथील व्यापारी नितीन गनशेट्टीवार (वय ४३) यांनी हिंगणाळा परिसरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे करोनाच्या टाळेबंदीत  चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा दिवसात ही तिसऱ्या व्यापाऱ्याची आत्महत्या आहे.

करोनाच्या टाळेबंदीत सलग दोन महिने व्यवसाय बंद राहिल्याने अनेक व्यापारी त्रासले आहेत. त्यांच्यावर खासगी सावकार तथा बँकेचे कर्ज झाले आहेत. अशातच खासगी सावकारांनी तर कर्जाची वसूली करण्यासाठी तगादा लावला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारात दुकान असलेले चहापत्ती व बिस्कीटचा ठोक व्यवसाय असलेले व्यापारी नितीन गनशेट्टीवार (वय ४३) गणपती मंदिर, बालाजी वार्ड येथील गणपती अपार्टमेंट मधून सोमवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाले होते. घरी पत्नीला भाजीपाला आणण्यासाठी जातो असे सांगून ते घराबाहेर पडले  ते परतलेच नाही.

दरम्यान, त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर आज दुपारी शहरालगतच्या हिंगणाळा या ग्रामीण भागातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.  टाळेबंदीत व्यवसायाला बराच फटका बसल्याने ते आर्थिक तणावात असल्याची चर्चा होती. त्यांच्या आत्महत्येने व्यापारी वर्गात चांगलीच धडकी भरली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. गनशेट्टीवार यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांना मागील काही दिवसांपासून खासगी सावकारांचे सातत्याने फोन येत होते. त्यामुळे पोलीस आता या खासगी सावकारांचाही शोध घेत असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे करोनाच्या टाळेबंदीत व्यापाऱ्याची ही तिसरी आत्महत्येची घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी चिमूर येथे एका किराणा व्यवसायिकाने आत्महत्या केली. त्यानेही कर्जाचा डोंगर झाला म्हणून गळफास लावून घेतला होता. त्यानंतर मूल येथे २२ मे रोजी पानठेला व्यवसायीक लोमेश गेडाम (४२) यांनी घराजवळील शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. अवघ्या पंधरा दिवसात छोटा व्यवसाय करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.