News Flash

झनक घराण्याची तिसरी पिढीही वाशीम जिल्ह्य़ाच्या राजकारणात

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वाशीम, रिसोडआणि मालेगाव तालुक्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झनक घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. रामराव झनक यांनी वाशीम मतदारसंघातून एक वेळा आणि मेडशी

| May 21, 2014 07:46 am

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वाशीम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झनक घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. रामराव झनक यांनी वाशीम मतदारसंघातून एक वेळा आणि मेडशी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण करून विधानसभेत चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे पुत्र सुभाष झनक यांनी घेऊन मेडशी मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण केली होती.
गेल्या १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष झनक यांचा पराभव झाल्याने या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अ‍ॅड. विजय जाधव विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मेडशी मतदारसंघावर प्रथमच भगवा फडकावला होता.
२००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने सुभाष झनक यांना उमेदवारी दिली नव्हती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मेडशीऐवजी रिसोड मतदारसंघ झाला.
नवनिर्मित रिसोड मतदारसंघातून प्रथम आमदार होण्याचा बहुमान सुध्दा सुभाष झनक यांनी पटकावला होता.
सुभाष झनक यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून एक वर्ष कार्य केले. त्यांच्या रूपाने जिल्ह्य़ाला प्रथमच लालदिवा मिळाला होता.
ऑक्टोबर २०१३ मध्ये सुभाष झनक यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने रिसोड मतदारसंघाचा राजकीय वारसा चालवण्याची संधी सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक यांना मिळाली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीस अमित झनक १२ हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. आता अमित झनक सुध्दा रिसोड मतदार संघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण करतात का, असा प्रश्न त्यांचे समर्थक करत आहेत. त्यांच्या विजयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. रिसोड मतदारसंघात त्यांच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

गडचिरोलीतील आदिवासी मतदारांना गृहित धरल्याने उसेंडींची बंडी उलार

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

गडचिरोलीत गेली पाच वर्षे पराभवाची सल जोपासणारे भाजपचे अशोक नेते यांच्या पदरात यावेळी मतदारांनी भरभरून कमळे टाकली. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेला आदिवासी समाजही मोदी लाटेवर स्वार झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर भविष्यात मोठे संकट उभे ठाकले आहे.

नक्षलवादग्रस्त असा राज्यातील एकमेव मतदारसंघ, अशी गडचिरोली-चिमूरची ओळख आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसने अखेरच्या क्षणी भाजपच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला होता. अवघ्या ३० हजार मतांनी पराभूत झालेले अशोक नेते यावेळी पुन्हा रिंगणात होते. यावेळी ते मोठय़ा फरकाने विजयी होतील, असा अंदाज आधीपासूनच बांधला जात होता. मोदी लाटेमुळे मताधिक्याचा हा फरक तब्बल अडीच लाखावर पोहोचला. मारोतराव कोवासे निष्क्रीय म्हणून काँग्रेसने त्यांना घरी बसवून आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे काहीच फरक पडला नाही. विधानसभेत फारशी प्रभावी कामगिरी बजावू न शकलेले डॉ. उसेंडी प्रचाराच्या काळात त्यांच्या कोटय़वधीच्या बंगल्यामुळेच जास्त चर्चेत राहिले. त्या तुलनेत अजूनही भाडय़ाच्या घरात राहणाऱ्या अशोक नेतेंच्या पारडय़ात मतदारांनी वजन टाकले.

या मतदारसंघात कागदावर तरी काँग्रेसची स्थिती अतिशय मजबूत होती. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. मात्र, या आमदारांविषयी सुद्धा जनतेच्या मनात रोष होता. तोच या निकालात दिसून आला. आमदार विजय वडेट्टीवार, डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम व रामरतन राऊत या तिघांच्या मतदारसंघात भाजपने निर्णायक आघाडी घेतली. आमदारांविषयी जनतेच्या मनात असलेला राग प्रचाराच्या काळात स्पष्टपणे दिसत होता. तरीही काँग्रेसच्या वतीने वडेट्टीवारांच्या स्वप्नपूर्तीसाठी उसेंडींना मते द्या, अशी जाहिरात केली गेली. त्यामुळे उसेंडी पुढे जाण्याऐवजी आणखी मागे गेले. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकत बऱ्यापैकी आहे. या ताकतीची साथ मिळावी म्हणून काँग्रेसने अहेरीत राजे धर्मराव आत्राम यांची मदत घेतली. सोबतच त्यांना पराभूत करणारे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले आमदार दीपक आत्राम यांचीही मदत घेतली. यामुळे उडालेल्या गोंधळात अखेर मतदारांनी भाजपच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला.

भामरागडसारख्या दुर्गम भागात सुद्धा भाजपला भरभरून मते मिळाली. या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मतदार काँग्रेसचा पारंपरिक म्हणून ओळखला जातो. यावेळी आदिवासी सुद्धा मोदी लाटेवर स्वार झाल्याचे दिसून आले. नक्षलवादाच्या समस्येमुळे या मतदारसंघात विकास नाही. आता अशोक नेते यांना सत्ताधारी खासदार असल्याचा फायदा घेत या भागाला विकासाच्या प्रक्रियेत आणावे लागणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमय झालेल्या या मतदारसंघात आता मोदी लाटेमुळे प्रचंड उलथापालथ झाली असून अनेक विद्यमान आमदारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मतदारांना गृहीत धरणे कसे धोक्याचे असते, हे या विजयाने काँग्रेसला दाखवून दिले आहे. या निकालामुळे मुलीला गडचिरोलीतून आणि स्वत:ला अहेरीतून विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या धर्मरावबाबा आत्रामांना मोठा धक्का बसला आहे.

 

मोदी लाटेमुळे संजय धोत्रे सर्वच

विधानसभा मतदारसंघात आघाडीवर

वार्ताहर, अकोला

अकोला मतदार संघात भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांना मोदी लाटेचा भरपूर फायदा झाला असल्याचे दिसून येते. सहा विधानसभा मतदारसंघात एकाही ठिकाणी या निवडणुकीत त्यांना इतर उमेदवारांच्या मागे रहावे लागले नाही वा इतरांना त्यांच्यापेक्षा जास्त मतेही घेता आली नाहीत. या निवडणुकीने काँग्रेसला पुन्हा पाच वर्षांसाठी वनवासात पाठविले आहे. १९८९ पासून या मतदारसंघात काँग्रेसला सातत्याने अपयश आले आहे.

गेल्या २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर असतांना प्रकाश आंबेडकरांना बाळापूर व मूर्तिजापूर या दोन विधानसभा मतदारसंघात संजय धोत्रेंपेक्षा प्रत्येकी ५ हजार मतांची आघाडी होती, पण यावेळी या दोनही ठिकाणी आंबेडकर धोत्रेंपेक्षा चांगलेच माघारले, याचा अर्थच असा आहे की, धाबेकर म्हणजे हिंदू उमेदवार असतांना मुस्लिम मतदारांनी आंबेडकरांना त्या दोन ठिकाणी मतदान केले, तर यावेळी काँग्रेसचे हिदायत पटेल उमेदवार असतांना मुस्लिम मते या दोन्ही ठिकाणी आंबेडकरांना मिळाली नाहीत म्हणून ते खूपच माघारले. संजय धोत्रे यांना या निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघातून ७७ हजार ९६४ मते मिळाली. याच मतदार संघात हिदायत पटेल यांना ४५ हजार ५६०, तर प्रकाश आंबेडकर यांना ३६ हजार १५९ मते पडली आहेत. २००९ मध्ये याच मतदारसंघात संजय धोत्रे यांना ४६ हजार ६०९, तर आंबेडकरांना ३८ हजार ७८५ मते मिळाली होती. यावेळी त्यात घट झाली आहे. मतदार संख्या वाढूनही आंबेडकरांना मागच्या वेळे इतकीही मते मिळाली नाहीत.

बाळापूर मतदारसंघात या निवडणुकीत संजय धोत्रे यांना ६३ हजार ५८७, हिदायत पटेल यांना ४३ हजार २१४ आणि प्रकाश आंबेडकरांना ५४ हजार ४९७ मते मिळाली. म्हणजे या मतदारसंघात सुद्धा ते माघारले. वस्तूत: या ठिकाणी २००९ च्या निवडणुकीत बाळासाहेबांनी धोत्रे यांच्यापेक्षा ५ हजार मते जास्त घेतली होती. ते आधिक्य आंबेडकर यावेळी राखू शकले नाहीत. यावेळी उलट आंबेडकरांना धोत्रेंच्या तुलनेत ९०९० मते कमी पडली. याचा अर्थ असा निघतो की, बळीराम सिरस्कार यांचा येथे प्रभाव पडला नाही व मुस्लिम मते सुद्धा आंबेडकरांना मिळाली नाहीत, तसेच नव काँग्रेसी नारायणराव गव्हाणकरांचा हिदायत पटेल यांना लाभ झाला नाही. हिदायत पटेल यांना या मतदारसंघात धोत्रेंपेक्षा २० हजार ३७३ मते कमी पडली. अकोला पश्चिममध्ये २०१४ च्या निवडणुकीत संजय धोत्रे यांना ७२ हजार ०८३ मते मिळाली, तर हिदायत पटेलांना ५७ हजार ३८० आणि प्रकाश आंबेडकरांना केवळ १६ हजार ८६९ मते प्राप्त झाली. अकोला पूर्व मध्ये संजय धोत्रेंना ८९ हजार ९९१, तर हिदायत पटेलांना केवळ २० हजार ७५२ आणि प्रकाश आंबेडकरांना ५२ हजार ६३० मते पडली. मूर्तिजापूर मतदारसंघात धोत्रेंना ७३ हजार १२७, हिदायत पटेलांना ३५ हजार २४४ आणि प्रकाश आंबेडकरांना ४८ हजार ०५८ मते मिळाली. रिसोड मतदार संघात संजय धोत्रेंना ७९ हजार २२४, तर हिदायत पटेलांना ५० हजार ९०५ व प्रकोश आंबेडकरांना ३० हजार ४७६ मते मिळाली.

या निवडणुकीत प्रथमच धोत्रे यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कायमच आघाडी घेतली. येथे सुरुवातीला धोत्रे व आंबेडकर यांच्यात लढत चांगली होईल, असे मानले जात होते, पण काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला व ही लढत भाजपा व काँग्रेस, अशी झाली, पण त्यातही मोदी लाटेने काँग्रेसचा सफाया केला. हिदायत पटेलांना सर्व स्तरातून मतदान होईल, असे सांगितले जात होते, पण काँग्रेसमधील सुंदोपसुंदी त्यांना बरीच महाग पडली. शिवाय, महागाई, भ्रष्टाचार सरकार दरबारी काम न होणे, अशी अनेक कारणे दिमतीला होतीच.

 

दलितांवरील अत्याचाराला रोखून गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणी

प्रतिनिधी, चंद्रपूर

दलितांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुमारे १६४७ दलित अत्याचारांच्या प्रकरणांची नोंद झालेली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणारे आघाडी सरकार दलितांवरील अत्याचाराला आळा घालून गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात कमी पडलेले आहे. नगर जिल्ह्य़ात नितीन आगे या दलित तरुणाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. जालना जिल्ह्य़ातील दलित सरपंच मनोज कसाब, औरंगाबादचे दलित कार्यकर्ते उमेश आगळे यांचाही जातीयवाद्यांनी अमानुष खून केला. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या फक्त घोषणा करीत आहेत, पण त्यांचे पोलीस अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करीत नाहीत. म्हणून दलितांवर बहिष्कार घालणे, डॉ. आंबेडकर व भगवान बुद्धाच्या जयंती मिरवणुकांना विरोध करणे असे अनेक संतापजनक प्रकार घडत आहेत.

रामदेवबाबासारख्या स्वयंघोषित योगगुरू दलित स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह भाषण करतात, पण सरकार त्यावर कठोर कारवाई करीत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्या आघाडी सरकारबद्दल तमाम फुले, आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारने दलित अत्याचाराला आळा घालण्याचे आदेश देऊन गुन्हेगारांना कठोर शासन करावे, यासह एकूण ८ मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यासह अनेक आंबेडकरी पक्ष व संघटनांनी संघटीत होऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळात अंकुश वाघमारे, खुशाल तेलंग, अ‍ॅड. सत्यविजय उराडे, प्रा. एस.टी. चिकटे, एन.डी. पिंपळे, रमेशचंद्र राऊत, सुरेश नारनवरे, पवन भगत, प्रा. ललीत मोटघरे, संतोष डांगे, प्रा. कोमल खोब्रागडे, अशोक निमगडे, वसंता चांदेकर, जितेंद्र डोहणे, सिद्धार्थ वाघमारे, तेजराज भगत, गोविंद मित्रा, पंकज काळे, धृव करमरकर यांच्यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते.

 

थूल  व डॉ. नितीन राऊत

यांची कवलेवाडाला भेट

दलित कार्यकर्त्यांचे जळीत प्रकरण

वार्ताहर, गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा गावातील घडलेल्या घटनेची माहिती घेण्याकरिता अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थूल व रोजगार हमी योजना आणि जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज, सोमवारी दुपारी 2 वाजता कवलेवाडा गावाला भेट दिली.

कवलेवाडा येथील घडलेल्या घटनास्थळाला त्यांनी भेट दिली. जखमी संजय खोब्रागडे यांच्या घरी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. कवलेवाडा गावातील नागरिक एकमेकांशी अत्यंत सामंजस्य व एकोप्याने राहत असतांना अचानक मन सुन्न करणारी दुर्देवी घटना कशी घडली, या मागचे नेमके कारण काय असू शकते, याबाबत त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यासाठी पोलीस दलाची आवश्यक ती कारवाई सुरू असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

सी.एल.थूल यांनीही यावेळी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन घटनेच्या सत्यतेची पडताळणी करण्यात येईल, असे सांगितले. गावामध्ये सामंजस्य व सलोखा कायम ठेवावा, असे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

कवलेवाडा येथे भेट देण्यापूर्वी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात असलेल्या संजय खोब्रागडे यांची भेट घेऊन सी.एल.थूल व डॉ.नितीन राऊत यांनी आस्थेने विचारपूस केली. कवलेवाडा येथील घटनास्थळी भेट दिल्यावर ज्या जागेवरून वाद घडला ती समाजभवनाची जागाही बघितली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप झळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश िशदे, उपविभागीय अधिकारी दिलीप सावरकर, पी.जी.कटरे, रत्नदीप दहिवले यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.

 

भावना गवळींची पाचही मतदारसंघात

आघाडी, मोघेंना पुसदचाच आधार

वार्ताहर, यवतमाळ

यवतमाळ-लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ पुसदचा एक अपवाद वगळता उर्वरित कारंजा, वाशीम, राळेगाव, यवतमाळ आणि दिग्रस या पाचही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांनी कांॅग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना मागे टाकून आघाडी घेऊन विजय संपादन केला.

भावना गवळी यांना वाशीम मतदारसंघात ८८ हजार ९९०, कारंजात ६४ हजार ८८९, राळेगावात ८३ हजार २६८, यवतमाळात ८७ हजार ५४४, दिग्रसमध्ये ९४ हजार ४६९ आणि पुसदमध्ये ५७ हजार ७७० मते मिळाली, तर शिवाजीराव मोघे यांना वाशीममध्ये ६० हजार ९६२, कारंजात ६० हजार ९२७, राळेगावात ६५ हजार २१३, यवतमाळात ५९ हजार १५६ आणि दिग्रसमध्ये ६७ हजार ३७० मते मिळाली. पुसद या एकाच मतदारसंघात मोघे यांनी गवळीपेक्षा आघाडी घेतली. गवळींना पुसदमध्ये ५७ हजार ७७०, तर मोघेंना ७९ हजार ०११ मते मिळाली. मोघे यांचा जवळपास ९४ हजार मतांनी भावना गवळींनी पराभव करून चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे.

या मतदारसंघात तब्बल २६ उमेदवार उभे होते. त्यात प्रामुख्याने विजयाची खात्री सांगणारे माजी खासदार जांबुवंतराव धोटे (फारवर्ड ब्लाक) यांना फक्त ४७०८ मते मिळाली. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. यापूर्वी दोनदा नागपूरमधून खासदार राहिलेले मात्र यवतमाळातून तीनदा खासदारकी हरलेल्या धोटेंनी दोनदा अनामत रक्कम गमावल्याचा अनुभव घेतला आहे. यावेळी हा त्यांचा तिसरा अनुभव आहे. या मतदारसंघातील मनसे, सपा, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी, भारिप-बहुजन महासंघ, सी.पी.एम, वेलफेअर पार्टी, खोब्रागडे आरपीआय, आंबेडकरकरिष्ठ रिपाई, प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी या पक्षांसह ११ अशा एकूण २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. मोघे-गवळी वगळता एकाही उमेदवाराला ६० हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांना १५५८, तर अपक्ष उपेंद्र पाटलांना ८९५, मनसेच्या राजू पाटलांना २६ हजार १९४, तर बसपाच्या बळीराम राठोड यांना ४८ हजार ९८१ मते मिळाली.

 

.. तर चारही पराभूत

मंत्र्यांचे पद धोक्यात

वार्ताहर, यवतमाळ

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राज्यातील चारही मंत्र्यांचे मंत्रीपद कायम राहणार की, ते स्वत नतिकतेच्या कारणावरून राजीनामा देणार की, केंद्रात सत्तारूढ होत असलेले भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार १९७७ चा कित्ता गिरवत कांॅग्रेस शासित सरकारे आणि तेथील विधानसभा बरखास्त करणार व त्यामुळे मंत्र्यांचे मंत्रीपद जाणार, अशा विविध चच्रेला जोरदार ऊत आला आहे.

गेल्या १९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीनंतर कांॅग्रेसच्या इंदिरा गांधींचे सरकार जाऊन १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांचे जनता सरकार केंद्रात सत्तारूढ झाले. जनता सरकारने राज्यात सत्तेत असलेल्या सर्व ९ कांॅग्रेसी सरकारांना व तेथील विधानसभांना बरखास्त करून नव्याने निवडणूका घेतल्या होत्या. आता मोदी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर १९७७ चा जनताकित्ता गिरवण्याची धास्ती कांॅग्रेस सत्तेत असलेल्या राज्य सरकारांनी घेतली आहे. महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण सरकार यांच्या नेतृत्वाखालील कांॅग्रेस आघाडी सरकार बरखास्त केलेच जाणार नाही, याची खात्री आघाडीलाही वाटत नाही. १९७७ चा कित्ता मोदी सरकारने गिरवला तर चारही मंत्र्यांचे भविष्य मात्र अंधकारमय होणार, हे स्पष्ट आहे.

 

झनक घराण्याची तिसरी पिढीही वाशीम जिल्ह्य़ाच्या राजकारणात

वार्ताहर, वाशीम

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वाशीम, रिसोडआणि मालेगाव तालुक्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झनक घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. रामराव झनक यांनी वाशीम मतदारसंघातून एक वेळा आणि मेडशी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण करून विधानसभेत चार वेळा प्रतिनिधित्व केले.

 त्यांच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे पुत्र सुभाष झनक यांनी घेऊन मेडशी मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण केली होती.

गेल्या १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष झनक यांचा पराभव झाल्याने या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अ‍ॅड. विजय जाधव विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मेडशी मतदारसंघावर प्रथमच भगवा फडकावला होता.

२००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने सुभाष झनक यांना उमेदवारी दिली नव्हती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मेडशीऐवजी रिसोड मतदारसंघ झाला.

नवनिर्मित रिसोड मतदारसंघातून प्रथम आमदार होण्याचा बहुमान सुध्दा सुभाष झनक यांनी पटकावला होता.

सुभाष झनक यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून एक वर्ष कार्य केले. त्यांच्या रूपाने जिल्ह्य़ाला प्रथमच लालदिवा मिळाला होता.

ऑक्टोबर २०१३ मध्ये सुभाष झनक यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने रिसोड मतदारसंघाचा राजकीय वारसा चालवण्याची संधी सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक यांना मिळाली आहे.

रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीस अमित झनक १२ हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. आता अमित झनक सुध्दा रिसोड मतदार संघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण करतात का, असा प्रश्न त्यांचे समर्थक करत आहेत. त्यांच्या विजयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले.

रिसोड मतदारसंघात त्यांच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 7:46 am

Web Title: third generation of zanak family in politics
टॅग : Politics
Next Stories
1 फसवणूक प्रकरणी ठेकेदारास तुरुंगवास
2 देवदासी महिला संघटनेचा विविध प्रश्नी लातुरात मोर्चा
3 कारवाईच्या आश्वासनानंतर नातेवाईकांचे आंदोलन मागे
Just Now!
X