राज्यात दोन वेळा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नसला तरी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ३१ वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांना एकत्र करून नवीन आघाडीची मोट बांधण्यास शेतकरी कामगार पक्षाने सुरुवात केली आहे.
शेकापच्या माध्यमातून यापूर्वी रिडालोस आणि डावी आघाडी असे दोन वेळा तिसऱ्या आघाडीचे प्रयोग करण्यात आले होते. मात्र ते फारसे यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे नवीन राजकीय समीकरणांचा शोध शेकापकडून सुरू होता.
रायगड जिल्हा परिषदेच्या निमित्ताने शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसशी यापूर्वीच जुळवून घेतले होते. आता राज्यातील ३१ पुरोगामी संघटना आणि मराठा संघटना यांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश संघटनांनी याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
काही दिवसांपूर्वीच पनवेल येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सर्व पुरोगामी विचारांच्याच पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिली होती. या वेळी शेकाप आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या पाश्र्वभुमीवर या राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, तसेच विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत. या सर्वानी आपल्या भाषणात नवीन आघाडीचे संकेतही दिले.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकी बहाल करून कोल्हापुरात नवे मराठे नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंत राष्ट्रवादीत असलेल्या संभाजी राजेंना भाजपने आपल्या जाळ्यात ओढल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांतमध्येही प्रचंड धुसफुस सुरू होती. ही नाराजी दूर व्हावी म्हणून शाहू महाराजांना शेकापच्या व्यासपीठावर आणून भाजपवर निषाणा साधण्यात आला.
कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारातून या पुरोगामी संघटनांना एकत्रित करण्याबाबत दोन बठका झाल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. पन्हाळगडावर एकत्रित बठक घेऊन याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले
संघटना म्हणून आम्ही ज्यांच्या पाठीशी उभे राहिलो त्यांनी आम्हाला साथ दिली नाही. मराठा आरक्षणासारख्या मुद्दय़ावर आम्हाला ११ वर्षे पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शेकापच्या नेतृत्वाखाली राज्यातील पुरोगामी संघटना एकत्र येऊन यापुढील काळात काम करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शेकाप नेते जयंत पाटील यांनी यापूर्वीही नवीन राजकीय समीकरणांचे प्रयोग केले आहेत. या पाश्र्वभूमीवर नव्याने निर्माण होऊ पाहणारी ही समीकरणे कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.