प्रदीप नणंदकर, लातूर

काँग्रेस पक्षाच्यावतीने तिसऱ्या टप्प्याची जनसंघर्ष यात्रा बुधवारी लातूर जिल्हय़ात तुळजापूरहून प्रवेश करती झाली. जिल्हय़ात या यात्रेला विलासराव देशमुख स्मरणयात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. दुष्काळ व सरकारच्या नाकत्रेपणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा विलासरावांचे स्मरण करण्यातच नेत्यांनी धन्यता मानली.

औसा, निलंगा, लातूर व उदगीर या चार ठिकाणी जनसंघर्ष यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली होती. सर्वच ठिकाणी यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. लातुरातील जाहीर सभा तर निवडणूक काळातील सभेप्रमाणे गाजली. नेटके व नेमके नियोजन, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केल्याने सभेकडे लोकांचे चांगले लक्ष लागले होते. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आदी नेत्यांची भाषणे लातुरातील सभेत गाजली. हर्षवर्धन पाटील व बाळासाहेब थोरात यांना विलासरावांनी मोठे केले हे जगजाहीर आहे. त्यांनी आपल्या भाषणातील निम्मा वेळ विलासराव देशमुखांच्या आठवणी सांगण्यात खर्ची घातला. सामान्य माणसात मिसळणारे विलासराव, सामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे, कोणीही त्यांना सहज भेटत असत अशा आठवणी या मंडळींनी सांगितल्या खऱ्या, मात्र आता लातुरातील प्रत्येक व्यक्तीला जवळपास त्या तोंडपाठ झाल्या आहेत. विलासरावांचे मोठेपण लोकांना माहितीच आहे. त्यांची अपेक्षा इतकीच आहे की, सध्याची काँग्रेसची मंडळी कोणत्या पद्धतीने काम करत आहे, सत्तेत येण्याची ईर्षां त्यांनी बाळगली आहे का? प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास केला आहे का? दुष्काळ जाहीर करण्यातील शासनाच्या नेमक्या त्रुटीवर बोट दाखवण्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणीची अपेक्षा काँग्रेसच्या मंडळींकडून होती, मात्र या बाबतीत प्रमुख नेत्यांनी निराशा केली.

आ. अमित देशमुख यांचे प्रास्ताविकपर भाषण हेच सभेचे मुख्य आकर्षण होते. राज्य व देशातील प्रश्न नेते मांडतील. नेमकी जिल्हय़ातील शासकीय यंत्रणेची स्थिती काय आहे, सामान्यांच्या प्रश्नाकडे कशी डोळेझाक केली जात आहे, यासंबंधी आक्रमक भाषेत त्यांची मांडणी झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या भाषणात शेतीचा प्रश्न हिरिरीने मांडला. शेतीकडे सरकारचे दुर्लक्ष कसे होते आहे व नेमके काय व्हायला हवे याची मांडणी करताना सर्व घटकांचे समाधान होईल अशी धोरणे राबवणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी मांडले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण मात्र मुद्देसूद होते. प्रचारी टीकेपेक्षा लोकांना पटतील असे मुद्दे त्यांनी मांडले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच यात्रा असल्याने ते सभेचे मुख्य आकर्षण होते मात्र त्यांना केवळ दहा मिनिटेच बोलण्याची संधी मिळाली, त्यामुळे सगळीकडे जे मुद्दे मांडले जातात त्यावरच त्यांना भर द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे भाषण फारसे गाजले नाही.

सत्यजीत तांबे, हर्षवर्धन पाटील व बाळासाहेब थोरात यांनी अमित देशमुखांना मतदारसंघात अडकवून ठेवू नका, त्यांना महाराष्ट्रभर फिरण्यासाठी मोकळीक द्या, असे आवाहन आपल्या भाषणात केले, मात्र हे ऐकण्यासाठी त्यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यांनी हे वाक्य ऐकण्याची गरज असल्याची उपस्थितांत चर्चा होती. विलासरावांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख यांचेही भाषण गाजले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

नुसतीच टीका, मूळ मुद्दा दुर्लक्षित

माजी मंत्री नसीम खान यांना त्यांचे विलासरावांवरील प्रेम पाहून भाषणाची संधी देण्यात आली, मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय खालच्या स्तराची भाषा आपल्या भाषणात वापरली व संपूर्ण भाषण मोदींवर टीका करण्यात खर्ची घातले, त्याबद्दल व्यासपीठावरील मंडळीतच नाराजी होती. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने दुष्काळ पाहणी दौरा असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र दुष्काळ पाहणी दौऱ्यात किती जणांना भेटलो, नेमके लोकांचे काय म्हणणे आहे, पावसाची आकडेवारी शासनाने जाहीर केली काय व प्रत्यक्षातील स्थिती काय, दुष्काळ जाहीर करताना कोणते निकष वापरले व ते कसे गैरलागू आहेत, अशा मुद्दय़ांवर अभ्यासपूर्ण भाषण यानिमित्ताने कोणीतरी करायला हवे होते, मात्र एकाही वक्त्याने या प्रश्नांना हात लावला नाही.