News Flash

वर्ध्यातील ‘हे’ दांपत्य करणार यंदा विठूरायाची महापूजा

मुख्यमंत्र्यांसह पूजा करण्याचा मिळाला मान; गेल्या वर्षीही हा मान वर्ध्यातल्याच दांपत्याला मिळाला होता.

केशव शिवदास कोलते व इंदूबाई केशव कोलते

आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दर्शन रांगेतून एकाची निवड करुन मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. पण, गेल्यावर्षीपासून करोनामुळे सर्वकाही बंद असल्याने वारीवरही बंधने घालण्यात आली. त्यामुळे मंदिरातच सेवा देणाऱ्या एका सेवेकऱ्याची निवड करुन महापूजेचा मान दिला जात आहे. यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील दांम्पत्याला हा मान मिळाला आहे.

केशव शिवदास कोलते(७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) रा. संत तुकाराम मठ, वर्धा असे महापूजेचा मान मिळालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेत सहभागी होणार आहे. केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून एकटेच पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात २४ तास वीणा वाजवून सेवा करीत आहे. त्यांच्या पत्नी इंदूबाई व मुलगा ओमप्रकाश कोलते हे वर्ध्यातील घरी राहतात. त्यांना चंदा आणि नंदा नावाच्या दोन मुलीही आहेत. ते वीस वर्षांपासून माऊलींच्या सेवेत आहेत.

हेही वाचा – पायी वारीच्या मागणीसाठी नागपुरात वारकऱ्यांचे भजन आंदोलन

पंढरपूर देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मानाचा वारकरी म्हणून त्यांची निवड केली आहे.

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आठ वीणेकरी पहारा देण्याची सेवा करतात. यापैकी दोन विणेकऱ्यांना मागील वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला होता. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील डवलापूर या गावचे कवडू नारायण भोयर व कुसूमबाई भोयर या दाम्पत्याचा समावेश होता. यावर्षीही वर्ध्यातील केशव शिवदास कोलते व इंदूबाई केशव कोलते यांना मान मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 2:50 pm

Web Title: this couple will perform pooja at pandharpur vitthal mandir vsk 98
Next Stories
1 “…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटील यांनी सांगितलं भेटीचं कारण!
2 “मला कालपासून फोन येत आहेत…”, मनविसेच्या अध्यक्षपदाबाबत अमित ठाकरेंनी दिलं सूचक उत्तर!
3 महावितरणच्या ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचांवर अखेर न्यायिक सदस्यांची निवड!
Just Now!
X