“आजच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची जाणीव नक्कीच होईल. संपूर्ण राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यात आज (१ डिसेंबर) पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी मतदान सुरू आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रितरीत्या प्रथमच निवडणूक लढवत असल्याने, त्यांच्या दृष्टीने इतिहास घडवणारी, तर भाजपच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दोन लाख पदवीधर निवडणार ‘आपला प्रतिनिधी’

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, “ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनानची नांदी ठरेल. आजची निवडणूक ही महाविकासआघआडीला एक मोठा हादरा देईल. लोकाशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव असे प्रभावी शस्त्र आहे, जे सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आघाडी सरकारला किती कंटाळले आहेत हे समजेल. यासोबतच सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात केले, ते फारच उत्साहवर्धक होते. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडणार नाही, मात्र पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल, अशी इच्छा व्यक्त करतो.”

या निवडणुकांनंतर राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे.