महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करणारे शिक्षण प्रसारक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या जाण्याने काँग्रेसची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पतंगराव कदम यांचे मुंबईत शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास लीलावती रूग्णालयात निधन झाले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी पतंगराव कदम यांनी कसोशीचे प्रयत्न केले. भारती विद्यापीठ या नावाने उभी केलेली संस्था हे त्याचेच फलित आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची कधीही भरून न निघाणारी हानी झाली आहे अशा शब्दात राहुल गांधी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

शुक्रवारीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लीलावती रूग्णालयात जाऊन पतंगराव कदम यांची भेट घेतली होती. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पतंगराव कदम यांची प्राणज्योत मालवली. पतंगराव कदम हे काँग्रेस पक्षातील असे नेते होते ज्यांनी आपल्या कार्यशैलीच्या जोरावर एक वेगळा ठसा निर्माण केला होता. सगळ्याच राजकीय पक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. रयत शिक्षण संस्थेतील एक शिक्षक ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार हा त्यांचा प्रवास खरोखरच झंझावाती म्हणावा असाच आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका चांगल्या नेत्याला महाराष्ट्र मुकला असे म्हणत त्यांना आदरांजली वाहिली आहे.