सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती, ठाकरे सरकारचे हे पाप आहे!” असं म्हणत शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता – देवेंद्र फडणवीस

“एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच…त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या..दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!” असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.

तर, “सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे.” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“ठाकरे सरकारने कारवाई केल्याचा आव आणू नये, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”

तसेच, राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे.” अशी मागणी देखील चंद्रकांत  पाटील यांनी केलेली आहे.