दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, जगण्याची नवी उभारी देण्याचा सण! ‘दिवाळी’ हा शब्द उच्चारला, तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो, मन हर्षोल्हासित होते. नवी खरेदी, फराळाचे नानाविध पदार्थ, रांगोळी-रोषणाई, भेटवस्तू आणि आनंदीआनंद अशा वातावरणाची आस आपल्याला लागते. घरातील साफसफाईची लगबग सुरू होते. यंदाची दिवळी फक्त तीन दिवसांची आहे.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन सण एकत्र आल्यामुळे यंदाची दिवाळी तीन दिवसांची आहे. नरक चतुर्दशी आणि दर्श अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन या दोन तिथी रविवारी (२७ ऑक्टोबर) रविवारी एकाच दिवशी आल्या आहेत. नरक चतुर्दशीला पहाटे ४.३० ते ५.३० या ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करावे. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी दर्श अमावास्या सुरू होत आहे. सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटे ते रात्री साडेआठ या सर्वोत्तम मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करावे, असे शारदा ज्ञानपीठमचे पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.

सोमवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्येला पहाटेपासून सकाळी ९ वाजण्यापूर्वी तर दिवाळी पाडव्याचे मंगलस्नान सोमवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजून ९ मिनिटांनंतरच करावे. पत्नीने पतीचे औक्षण करून दिवाळी भेट घेण्याचा कार्यक्रम सकाळी ९ वाजून १० मिनिटांनंतर दिवसभरात केव्हाही करावा. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) भाऊबीजेचा सण साजरा करावा, असे गाडगीळ यांनी सांगितले.