मंदार लोहोकरे

माझ्या जीवाची आवडे ..पंढरपुरा नेईन गुढी म्हणत समतेची पताका खांद्यावर घेऊन ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत वारकरी पंढरीला येतो. विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवून आपली वारी पोहोचती करतो. ही शतकांची परंपरा यंदा खंडित झाली आहे. करोनामुळे यंदा फक्त प्रतीकात्मक वारी आहे. त्यामुळे पंढरीत नेहमी असलेली भाविकांची गर्दी नाही. टाळ-मृदुंगाचा गजर ना हरिनामाचा जयघोष कानी पडतोय.. अगदी सुन्न आणि शांत पंढरीत एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. ज्या भाविकांचे स्वागत करण्यासाठी प्रशासनाची नेहमी लगबग असते त्याच प्रशासनाला यंदा भाविकांना रोखण्याचे काम करावे लागत आहे.

यंदा फक्त मानाच्या पालख्या आणि त्याबरोबर २० जणांना प्रवेश दिला आहे. इतर कोणत्याही भाविकाला पंढरीत प्रवेश नाही. तसेच अडीच दिवस पंढरीत संचारबंदी लागू केली आहे. वारकरी संप्रदायात वारी आणि शिस्त याची सांगड आहे. ठरावीक तिथीला पालखीचे प्रस्थान, मुक्काम, रिंगण सोहळा आदी शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा जोपासली जात आहे. मात्र यंदा करोनामुळे सारेच निर्बंध आले. मानाच्या पालख्यांचे प्रस्थान ठरलेल्या वेळी झाले. मात्र पुढील पालखी सोहळा रद्द झाला. ज्या गावात पालखी मुक्कामी येते ते गाव गर्दीने फुलून जायचे. जशी वारी पुढे पंढरीच्या दिशेने जात तसे भाविकांना विठुरायाच्या भेटीची आस लागते.

एकादशीला शासकीय महापूजेची लगबग सुरू असते. त्याच वेळी पंढरीत आलेले लाखो भाविकांचे पाय चंद्रभागेकडे वळत असतात. चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी पहाटेपासून गर्दी होते. कपाळी गंध, वासुदेव तर दुसरीकडे नगरप्रदक्षिणा करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध एका रांगेत निघालेले वारकरी आणि टाळ-मृदुंगाचा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात पांढरी नाहून निघायची. यंदा मात्र केवळ नऊ पालख्या आणि त्यांच्या बरोबरचे भाविक असणार. ते सुद्धा तोंडाला मुखपट्टय़ा लावून आणि योग्य अंतर ठेवून नगरप्रदक्षिणा करणार.

दरवर्षी लाखो भाविक येणार म्हणून प्रशासन तयारी करीत असे. भाविकांना आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पोलीस बंदोबस्त, दर्शन रांग आणि रांगेतील भाविकांना मंदिर समितीमार्फत पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवली जायची. यंदा भाविकांना रोखण्याचे अवघड काम प्रशासनाला करावे लागले. असे असले तरी संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली. आता करोनाचे संकट दूर होऊन विठू माझा लेकुरवाळा.. संगे भक्तांचा मेळा असे वर्णन अभंगातून केले. त्या विठूरायाच्या दर्शनाला लवकर भाविकांना येऊ देत आणि करोनाचे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना भाविक करीत आहे.

यंदा पंढरीत शुकशुकाट आहे. संचारबंदीमुळे स्थानिक लोकांनाही मंगळवारपासून घराबाहेर पडणे शक्य झालेले नाही. अनेक वर्षांनंतर आषाढीच्या दिवशी एरव्ही दुमदुमणारी पंढरी सुनीसुनी झाली. काही भाविकांनी पंढरपुरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून सीमेवरच अडविले. अर्थकारण यात्रेवर अवलंबून असल्याने पंढरी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक आषाढीच्या यात्रेवर अवलंबून असतात. यंदा मात्र वारकरी नकोत अशी पंढरपूरवासीयांचीच भूमिका होती. कारण मोठय़ा प्रमाणावर भाविक जमल्यास करोनाचे संकट वाढण्याची भीती आहे.