उस्मानाबादकरांचे आदरातिथ्याने महामंडळाची स्थळ पाहणी समिती चांगलीच भारावून गेली आहे. त्यामुळे आता यंदा निराशा होऊ देणार नाही. महामंडळाच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत. अशा सूचक शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचा मार्ग सूकर असल्याचे संकेत दिले.

आगामी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती आज (बुधवार, १७ जुलै) उस्मानाबाद शहरात दाखल झाली होती. शहरातील विविध मैदानं आणि निवासाच्या सोयी-सुविधांची पाहणी केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर बैठकीत उस्मानाबादला साहित्य संमेलन मिळण्यासाठी आपण अनुकूल प्रयत्न करणार असल्याचे ठाले पाटील यांनी जाहीर केले. यावेळी मंचावर महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष प्रा. रामचंद्र काळुंखे, सदस्य प्रतिभा सराफ, प्रदीप दाते आदींसह जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

उस्मानाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेने मागील दहा वर्षांत लक्षवेधी काम केले आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटनांना विश्वासात घेऊन त्यांनी निर्माण केलेले सर्व समावेशक वातावरण संमेलन यशस्वीतेसाठी पूरक आहे. सध्या आर्थिकदृष्ट्या आणि साहित्यीक भूमिका याबाबत संमेलनातील आचारसंहितेत बिघाड झाले आहेत. आगामी साहित्य संमेलनापासून त्यात काटेकोरपणे दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल. उस्मानाबादकरांची मागणी मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे उस्मानाबादला साहित्य संमेलन मिळावे यासाठी आपण अनुकूल प्रयत्न करणार असल्याचे ठाले-पाटील यांनी सांगितले. स्थळ पाहणी समितीचा अहवाल लवकरच महामंडळाकडे सादर केला जाईल. त्यानंतर महामंडळातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाईल. उस्मानाबादकरांना त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत, अशा सूचक शब्दात ठाले पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्व पातळीवर सहकार्य करणार असल्याचे सांगितले. संमेलनासाठी पोलीस प्रशासन देखील शक्य तेवढी मदत करील, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, महेश पोतदार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अभय शहापूरकर, नाट्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी उस्मानाबादकरांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.