अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठया उत्साहात रंगणारा सारस्वतांचा मेळा यंदा उस्मानाबादेत होण्याची शक्यता आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेकडून त्यासाठी मागील चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यंदा संमेलन मिळावे यासाठी संमेलनस्थळ, निवास आणि भोजन व्यवस्था, वाहनतळ आणि इतर महत्वपूर्ण सुविधा त्याचबरोबर उस्मानाबाद दर्शन अशी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

वर्षभरापासून त्यासाठी मसापचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सामान्य उस्मानाबादकर देखील या प्रक्रियेत उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदवत आहेत. आता केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. चार वर्षानंतर पुन्हा एकदा स्थळ पाहणीसाठी महामंडळाचे पथक उस्मानाबादेत येणार आहे. यापूर्वी २०१४ साली पथकाने उस्मानाबादला भेट दिली होती. मात्र तेंव्हा हे संमेलन घुमान येथे पार पडले.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे यंदा एकुण चार प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी लातूर आणि बुलढाणा या दोन प्रस्तावांना बाजूला ठेवत महामंडळाने नाशिक आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवली आहे. सप्टेंबर महिन्यात नाशिक आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणी स्थळ पाहणीसाठी महामंडळाचे पथक दाखल होईल. त्यानंतर संमेलनाचे यजमानपद नेमके कोणाला मिळणार ? हे जाहीर केले जाणार आहे. उस्मानाबादकरांच्या आशा मात्र यंदा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने साहित्य संमेलन मिळावे यासाठी मागील पाच वर्षांपासून तयारी सुरू ठेवली आहे. संमेलनासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबींची विस्तृत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेले भव्यदिव्य असे २७ वे मराठवाडा साहित्य संमेलन, त्यानंतर लेखिका साहित्य संमेलनाचे दर्जेदार नियोजन या सर्व बाबी महामंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर संमेलनस्थळ, पार्किंग व्यवस्था, निवासासाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि सर्वात महत्त्वाचे संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला निधी संकलन हा विषय स्थळ पाहणीसाठी येणार्‍या पथकासमोर मांडला जाणार आहे.

सर्वांच्या सहकार्याने संमेलन यशस्वी करू : तावडे

यंदा होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळावे, यासाठी आग्रही मागणी केली आहे. महामंडळाकडूनही उस्मानाबादच्या प्रस्तावास प्राधान्याने घेतले असल्याची माहिती उस्मानाबाद मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली. संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादकरांना मिळाल्यास वाङमयीन दर्जा राखून साहित्य आणि साहित्यिकांचा सन्मान वृद्धिंगत व्हावा, असे संमेलन आयोजित करण्याचा मानस आहे. उस्मानाबादमधील विविध संस्था, संघटना संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उत्सुक आहेत. यापूर्वी दोन साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्याचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे हे संमेलन मिळाल्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी करू, असा विश्वास मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे यांनी व्यक्त केला आहे.