मोहनीराज लहाडे

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत तर चार जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया अद्याप बाकी असली तरी बिनविरोध झालेल्या जागा व त्यावर काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीने मिळवलेले वर्चस्व पाहता बँक थोरात गटाच्या ताब्यात आल्याचे मानले जाते. भाजपचे नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते, त्यासाठी बैठका घेतल्या होत्या. निवडणूक जरी जिल्हा बँकेचे असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याच्या शल्याचे आणि पराभवाचे वचपे बँकेच्या निवडणुकीत काढले गेल्याने निवडणूक रंगतदार झाली. बँकेची यंदाची निवडणूक आणखी एका वेगळ्या कारणासाठी ओळखली जाणार आहे, ती म्हणजे बँकेत अनेक तरुण चेहरे, विशेषत: जिल्ह्य़ाच्या सहकारात दिग्गज असलेल्या नेत्यांची मुले बँकेत संचालक म्हणून दाखल झाली आहेत.

राज्यातील ज्या काही मोजक्या जिल्हा बँका आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्याचे मानले जाते, त्यामध्ये नगरच्या बँकेचा वरचा क्रमांक लागतो. जिल्ह्य़ातील निवडणुकांना असलेल्या परंपरेप्रमाणे यंदाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीला थोरात विरुद्ध विखे यांच्यातील संघर्षांचे परिमाण लाभले होते. मात्र त्याला आणखीन अन्य कारणांचीही जोड मिळाली. बँकेच्या निवडणुकीत किंवा सहकारातील निवडणुकीत यापूर्वी पक्षीय चित्र पाहण्यास मिळत नव्हते यंदा मात्र ते निर्माण झाले. माजी मंत्री विखे यांच्या पुढाकारातुन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्य़ातील भाजप नेत्यांनी एकत्रितपणे पॅनल म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सहाजिकच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची राज्यातील महाविकास आघाडी बँकेच्या निवडणुकीतही उतरली. मात्र शिवसेनेच्या हाती फारसे काही लागले नाही. केवळ या पक्षाचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची एकमेव जागा, शिवसेनेसाठी बिनविरोध निघाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे चिरंजीव व तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड यांची ही भूमिका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी ती वेळोवेळी प्रकटही केली. त्यातूनच त्यांनी पिचड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव घडवून आणला. असाच अनुभव राष्ट्रवादी सोडून गेलेल्या बबनराव पाचपुते यांनाही त्यावेळी आला होता. आत्ताही शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसनेते थोरात यांच्या मदतीने पिचड यांची कोंडी केली. पिचड यांचेच सहकारी बँकेचे, मावळते अध्यक्ष सीताराम गायकर यांना बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करताना पिचड यांना उमेदवारी मागे घेण्याशिवाय पर्याय ठेवला नाही. विखे यांच्या पुढाकारातून पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिचड यांच्या नेतृत्वाखालील अकोल्यातील सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आलेला आहे. या कारखान्याची लवकरच निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडेही शरद पवार यांचे बारीक लक्ष राहणार आहे.

विखे यांनी जिल्ह्य़ातील भाजप नेत्यांची मोट बांधून ती थोरात-राष्ट्रवादी यांच्या विरोधात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फडणवीस यांच्यामार्फत या सर्वांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. मात्र पराभवाचा झटका बसलेले भाजपचे नेते आता सावध झाले होती. कर्डिले, कोल्हे, राजळे, पिचड हे थोरात यांच्या संपर्कात राहिले. यातून थोरात व राष्ट्रवादीला विखे यांची कोंडी करण्यासाठी बळच मिळाले. त्याचा परिणाम बिनविरोध झालेल्या बहुसंख्य जागांवर थोरात-राष्ट्रवादी यांचे वर्चस्व निर्माण होण्यात झाले. बिनविरोध जागांमध्ये राष्ट्रवादी समर्थक आठ, काँग्रेस किंवा थोरात समर्थक पाच तर विखे समर्थक दोन आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे अखेरच्या वेळी विखे यांची संगत सोडून थोरातां मिळाले.  सेवा संस्थेच्या नगर, पारनेर, कर्जत यासह बिगर शेती मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान अद्याप बाकी आहे.

नवे चेहरे अन् तिसरी पिढी

यंदा जिल्हा बँकेत अनेक नवे चेहरे, तरुण संचालक म्हणून दाखल झाले आहेत. त्यामध्ये आशुतोष अशोक काळे, अमित अशोक भांगरे, विवेक बिपीन कोल्हे, राहुल कुंडलीकराव जगताप, अमोल जगन्नाथ राळेभात आदींचा समावेश आहे. यातील आशुतोष काळे व विवेक कोल्हे तिसऱ्या पिढीच्या स्वरूपात बँकेत संचालक झाले आहेत. यापूर्वी आशुतोष यांचे आजोबा शंकरराव काळे, आजी सुशीलामाई काळे, वडील अशोक काळे संचालक होते तर विवेक कोल्हे यांचे आजोबा ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, वडील बिपीन कोल्हे बँकेत संचालक होते. अमित भांगरे यांचे वडील अशोक भांगरे तसेच राहुल जगताप यांचे वडील  कुंडलिकराव यापूर्वी संचालक होते.

शेतकरी व साखर कारखानदारांच्या दृष्टीने जिल्हा सहकारी बँक महत्त्वाची आहे. त्यामुळेच जिल्ह्य़ातील नेतेमंडळींचा आपण मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपल्याला यशही आले आहे. जिल्हा बँकेत विशेषत: सहकारामध्ये पक्षांच्या पलीकडे जाऊन निवडणुका केल्या जातात. त्यामुळेच आपण यंदाही पक्षीय विचाराला बाजूला ठेवून सर्वांचा मेळ घातला. त्यासाठी जिल्ह्य़ातील नेत्यांनीही आपल्याला सहकार्य केले. बँकेत आता आगामी अध्यक्ष आमच्या पॅनलचा असेल.

-बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री.