धवल कुलकर्णी

चिकन खाल्ल्यामुळे जगभरात करोना व्हायरसची लागण होते, ही अफवा पसरवणारे दोघे आता ट्रॅक झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पावलं उचलण्यास सुरूवात केल्याचं महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी लोकसत्ता डॉट कॉमला सांगितले.

या एका अफवेमुळे सध्या चिकनची मागणी घटली आहे. यामुळे पोल्ट्री इंडस्ट्रीला घरघर लागली आहे. सुनील केदार यांनी सांगितले की, या अफवांचा एकूणच पोल्ट्री इंडस्ट्रीवर परिणाम झाल्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. हे मेसेज दोन आयपी अॅड्रेसवरून फॉरवर्ड करण्यात आले होते आणि त्यातला एक उत्तर प्रदेशातला व दुसरा आंध्र प्रदेशातला आहे असे पोलिसांना आढळून आलं आहे.

“हे लोक कोण आहेत याबाबत शोध सुरू आहे. जगभरात संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की चिकनचे सेवन केल्यामुळे पसरत नाही,” असे केदार यांनी सांगितले.

केदार म्हणाले की, करोनाच्या अफवांमुळे या व्यवसायाचे आतापर्यंत साधारणपणे रुपये सहाशे कोटी इतके नुकसान झाले आहे. चिकनची मागणी आणि किमती कमी होत आहेत आणि कोंबड्यांना दिले जाणारे खाद्य जसे की मका वगैरे यांची मागणीसुद्धा घटली आहे. याचा थेट परिणाम बँकांकडून पोल्ट्री व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर आणि वीज बिलांच्या भरण्यावर होईल. पोल्ट्री व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती सुद्धा होते कारण साधारणपणे दोनशे पक्षांच्या मागे सहा जणांची गरज असते, असे केदार म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये संघटित क्षेत्रांमध्ये साधारणपणे पाच कोटी 6 लाख कोंबडी असून असंघटित क्षेत्रांमध्ये जसे शेतकऱ्यांच्या परसदारात अंदाजे दोन कोटी 21 लाख कोंबड्यांची पैदास होते.