आधी निसर्ग चक्रीवादळ नंतर करोनाची साथ आणि आता महाडची इमारत दुर्घटना अशा एकामागून एक आपत्ती रायगड जिल्ह्यावर ओढावत असतांना, तीन महिलांनी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगडच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रतिकूल परिस्थिती देखील व्यवस्थितपणे हाताळली आणि प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी हाताळण्यातही महिला कमी नाहीत याची चुणूक दाखवून दिली.

संकट येतात, तेव्हा ती चहू बाजूनी येतात, अशा प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता नेटाने सामोरे जायचे असते. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. आधी निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्याची धुळधाण उडवली.  अर्धा रायगड वादळाच्या तडाख्याने उध्वस्त झाला. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २४ हजारांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाड, माणगाव, गोरेगाव, रोहा अलिबाग परिसराला पूराचा तडाखा बसला आणि आता महाड येथे पाच मजली इमारतच कोसळली. संकटांची मालिकाच जणू रायगडकरांच्या मागे लागली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत तीन महिलांनी रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी नेटाने संभाळल्याचे दिसत आहे.

maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मिळालेल्या संधीला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निसर्ग वादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी गावागावात जाऊन आढावा घेतला. लोकांचे प्रश्न शासनस्तरावर मांडले आणि पाठपुरवा करत वाढीव मदत मंजूर करून घेतली. महाड इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच त्या मुंबईतून तात्काळ महाड मध्ये दाखल झाल्या रात्रभर घटनास्थळावर उभ राहून मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यानंतरही दोन दिवस महाड येथे थांबून त्यांनी प्रशासकीय यंत्रणांचे मनोबल उचावले, आणि दुर्घटनेतील आपदग्रस्त कुटुंबांना धीर दिला. राज्य सरकारकडे पाठपुरावाकरून आपदग्रस्तांसाठी शासकीय मदत मंजूर करून घेतली.

इमारत दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी रात्रीच घटनास्थळी दाखल झाल्या. तीन दिवस त्यांनी तिथेच थांबून मदत व बचाव कार्याचे प्रतिनिधीत्व केले. मदत व बचाव यंत्रणामधील समन्वय राखणे, दिवसभरातील शोधकार्याचे नियोजन करणे, संध्याकाळनंतर दिवसभरातील घडामोडीचा राज्यसरकार आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करणे, महाड मध्ये येणाऱ्या मंत्री आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची व्यवस्था करणे, त्यांना सुरु असेलेल्या शोधकार्याची माहिती देणे, बचाव यंत्रणांना आवश्यक असणारी सामुग्री उपलब्ध करून देणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि जिल्हाधिकारी म्हणून या दुर्घटनेत कार्यरत असणाऱ्या सर्व यंत्रणांचे नेतृत्व करणे यासारख्या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागल्या आहेत. आपली कौटुंबिक जबाबदारी बाजुला ठेऊन त्या प्रशासकीय जबाबदारीला प्राधान्य दिले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकऱणाच्या प्रमुख डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रशासकीय जबाबदारी यथोचित पार पाडली. त्या प्रत्यक्ष घटनास्थळावर नसल्या तरी जिल्हाधिकारी कार्यालयातून सुत्रधाराची भुमिका त्यांनी मोठ्या कौशल्याने बजावली. एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करणे, दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील विवीध भागातून रुग्णवाहीका, वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी तात्काळ रवाना करणे, आपत्ती व्यवस्थापना यंत्रणांना कार्यान्वयित करणे, दुर्घटनाग्रस्तांसाठी रक्ताची व्यवस्था करणे, मदत व बचाव कार्यात स्थानिक आपत्ती प्रतिसाद दलांची मदत घेणे यासारखी जबाबदारी त्यांनी संभाळली.

अधिकारी म्हणून जेव्हा महिला एखाद्या पदावर कार्यरत असते. तेव्हा तिला त्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. महिला असल्याने त्यात सूट मिळत नाही. उलट महिला या मुळातच संवेदनशील असल्याने त्या चांगले काम करु शकतात हे या तिघींनी या आपत्तीच्या काळात दाखवून दिले.