शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या मुद्दयावरून भाजपाला टोला लगावला आहे. अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी शेतक-यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, रोज वर्तमानपत्रात आणि माध्यमातून बातम्या येत आहेत, की मुख्यमंत्री कोण होणार? आमचा होणार की तुमचा होणार? मला त्याची पर्वा नाही, मी तुमच्याशी बांधील आहे. ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं आहेत, त्यांना सांगतो की अगोदर शेतक-यांच्या डोक्यातील जी काही चीड आहे, जी काही आग आहे ती जर का शांत झाली नाही तर, कदाचित सत्तेचं आसन देखील यात भस्म होईल.

तसेच, याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, म्हणून मला असं वाटत की एक निवडणूक जिंकली की दुसरी जिंकायची, त्यासाठी लोकांचा आशिर्वाद घेण्यासाठी नुसते दौरे करायचे असा खुळचटपणा करणारा मी नाही. एवढा नराधम मी नाही. जोपर्यंत शेतक-यांनी आणि माताभगिनींनी दिलेल्या आशिर्वादचं फळ म्हणून त्यांच्यासाठी दोन, चार सुखासमाधानाची कामं करू शकत नसेल तर, राज्यकर्ता म्हणून जो कोणी असेल तर तो नालायक आहे, हे मी स्पष्टपणे बोलतो.

यावेळी ठाकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, मी सरकार विरूद्ध बोलत नाही. आमच आता जुळलं आहे. युती करताना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हीच अट ठेवलेली आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही हे पाहण्यासाठी मी आलो आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि माझे संबंध चांगलेच आहेत, यात लपवण्यासारखं काहीच नाही. आम्ही याचा उपयोग शेतकरी हितासाठी करणार आहोत असेही ते म्हणाले.