News Flash

बावधनमध्ये बंदी आदेश झुगारत हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा

दुपारपर्यंत या प्रकरणी शंभरहून अधिक ग्रामस्थांना पोलिसांनी अटक केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे प्रशासनाने घातलेला बंदी आदेश झुगारत बावधन (ता. वाई) येथे हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत बगाड यात्रेचे शुक्रवारी आयोजन केले गेले. दरम्यान याची प्रशासनाने गंभीर दखल घेत सकाळपासून शंभरहून अधिक ग्रामस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात यात्रा-जत्रांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आलेली आहे. बावधन येथील बगाड यात्रेसाठीही हजारो भाविक जमा होत असल्याने त्यावर प्रशासनाने निर्बंध लादले होते. दरम्यान बावधनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढल्याने गावाचा संपूर्ण परिसरच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही शुक्रवारी पहाटे बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले. यासाठी हजारो ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. या वेळी ही यात्रा न करण्याची प्रशासनाकडून पुन्हा एकदा विनंती करण्यात आली असली तरी या जमावाने ती झुगारून लावत हजारोंच्या उपस्थितीत बगाड मिरवणूक काढली.

दरम्यान, या वेळी असलेली तणावाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संघर्ष टाळण्याची भूमिका घेतली. मात्र ही मिरवणूक संपताच या प्रकरणी अटकसत्र सुरू केले. दुपारपर्यंत या प्रकरणी शंभरहून अधिक ग्रामस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात अजूनही अटकसत्र सुरूच आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल होत कारवाई होणार असल्याचे साताऱ्याचे अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मागील आठ दिवसांपासून गावात ही यात्रा साजरी न करण्याबद्दल प्रबोधन करण्यात येत होते. यातच गावातच अनेक रुग्ण निष्पन्न झाल्याने अशी हजारोंची गर्दी करणे खूपच धोकादायक होते. यामुळे संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. ग्रामस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले होते. असे असताना अशा प्रकारे गर्दी करत यात्रा करणे खूप गंभीर असून या प्रकरणी जबाबदार लोकांविरुद्ध निश्चित कारवाई होणार आहे.

– संगीता राजापूरकर चौगुले, प्रांताधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:50 am

Web Title: thousands march in bawadhan to protest against ban abn 97
Next Stories
1 पालघरमध्ये १०० खाटांची वाढ
2 दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई
3 फळमाशीला रोखण्यासाठी ‘सापळा’
Just Now!
X