सोलापुरात ५१ दिवसांत करोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजाराचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. तर मृतांची संख्या ९० झाली आहे. आज जिल्हा कारागृहातील आणखी पाच कैदी करोनाबाधित सापडले आढळून आले. त्यामुळे एकूण ३२ कैदी व ८ कर्मचारी बाधित झाले आहेत.  मात्र आतापर्यंत रूग्णालयात यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्त रूग्णांची संख्याही आता ४४७ (४२.९८ टक्के) झाली आहे.

आज करोनाशी संबंधित २३३ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यापैकी ४८ बाधित रूग्ण सापडले. तर एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. अद्यापि ६२२ अहवाल प्रलंबित आहेत.

आज कारागृहातील आणखी पाच कैद्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून याशिवाय भवानी पेठेत ८ करोनाबाधित सापडले. बुधवारपेठेतही आणखी ४ रूग्ण आढळून आले. तर अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथे एका महिलेला करोना विषाणूने बाधित केले. त्यामुळे जिल्हा ग्रामीण भागातील रूग्णसंख्या ४३ झाली आहे. यात पाच मृतांचा समावेश आहे.

आतापर्यंत ५१ दिवसांत एकूण ८३२६ संशयित रूग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी ७७६४ अहवाल हाती आले. यात १०४० रूग्ण करोनाबाधित निघाले. यात ४४८ महिलांचा समावेश आहे. एकूण ९० मृतांमध्ये ५४ पुरूष व ३६ महिला आहेत. ९० टक्के मृत हे वृध्द आहेत. सध्या रूग्णालयात ५०३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.