स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी सुरू ठेवलेली लढाई सत्याची अन् न्यायाची असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाल्याखेरीज राहणार नाही. या लढाईत राज्यकर्ते व साखर कारखानदारांचा कालच नैतिक पराभव झाला असून, शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये, त्यांना न्याय निश्चित मिळणार असल्याचा ठाम विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्यकर्ते व साखर सम्राटांवर चौफेर टीका करताना, ऊस उत्पादकांनी ठिय्या आंदोलनात सातत्य ठेवावे, आपल्याला न्याय मिळाल्याखेरीज मागे वळू नये, असे कळकळीचे आवाहन शेट्टी यांनी केले.
दरम्यान, उद्या सोमवारी (दि. २५) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह मान्यवर कराड दौऱ्यावर येत असल्याने जलद कृतीदलाच्या जवानांसह सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा कराडसह एकूणच तालुक्यात चोख बंदोबस्त बजावत आहे. अशातच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्या कराड बंदची हाक दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पोलिसांनी एकूण परिस्थितीवर नियंत्रण राखल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऊसदराच्या प्रश्नावर काल सकाळी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रातील आपले आंदोलन आणखी तीव्र केले. ‘स्वाभिमानी’तर्फे आजपासून, कराड येथे ठिय्या आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, प्रशासनाने कराडातील आंदोलनासाठी आवश्यक त्या सर्व जागा नाकारल्या असून, ठिय्या आंदोलनासाठी कराडपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरील पाचवडेश्वर मंदिर परिसरातील जागा देण्यात आली आहे. पाचवडेश्वर मंदिर महामार्गापासून सुमारे अडीच किलोमीटरवर असतानाही नदीकाठावरील या अडचणीच्या ठिकाणीही आज हजारो ऊसउत्पादकांनी हजेरी लावून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या वेळी आंदोलनकर्त्यांसमोर राजू शेट्टी ऊसदराची भूमिका मांडताना, शासन व साखर कारखानदारांवर घणाघाती टीका केली. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, शरद पवारांचे बारामतीच्या घरच्या मैदानावरील विरोधक पृथ्वीराज जाचक, इस्लामपूरचे बी. जी. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शरद पवारांच्या बारामतीतील त्यांचे कडवे विरोधक रंजन तावरे व सतीश काकडे हेही उद्यापासून येथे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पृथ्वीराज जाचक यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची उद्या सोमवारी २९ वी पुण्यतिथी असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह डझनभर मंत्रिगण व पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी श्रध्दांजली वाहण्यासाठी कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी येणार असल्याने काल रात्रीच प्रशासन सतर्क झाले. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सहकाऱ्यांसमवेत तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व दक्षता घेतल्या. रात्री उशिरा येथील पंकज हॉटेलमध्ये राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, तसेच स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन सामोपचाराची भूमिका घेतली. परवा यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर येणार आहेत. चव्हाणसाहेब महाराष्ट्राचे दैवत असल्याने तरी, त्यांच्या स्मृतिदिनी आंदोलनासह कोणताही गैरप्रकार होऊन कराडच्या लौकिकास काळिमा लागण्याचे कृत्य होऊ नये अशी भूमिका तुकाराम चव्हाण यांनी राजू शेट्टी यांच्या समोर मांडली. तसेच, कराडमध्ये आंदोलनासाठी जागा नसल्याबद्दल वस्तुस्थिती पटवून दिली. रात्री अडीच वाजता आंदोलनासाठी पाचवडेश्वर मंदिर परिसराची जागा निश्चित होऊन बैठक संपली. त्यानुसार आज दुपारनंतर येथे ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला आहे. आंदोलनाचे ठिकाण अगदीच आडबाजूला असतानाही हजारो शेतकऱ्यांनी येथे उपस्थिती लावून घोषणाबाजी करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. हे ठिय्या आंदोलन असेच पुढे चालू राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. आंदोलनकर्त्यांना आज कराड तालुक्यातील धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी भोजन पुरवले आहे. तर, उद्या कापिल गावाकडून भोजनाची सोय होणार आहे. तर, सुमारे २५ गावांनी भोजन देण्याची तयारी दर्शवल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
स्वाभिमानीची आडमुठी भूमिका नाही- राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आडमुठी भूमिका नसून, चर्चेचे दरवाजे खुले आहेत.  ऊसदराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होऊन लवकरात लवकर सुटावा. उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी कराड दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी सकारात्मक चर्चेचा निरोप पाठवल्यास त्यांच्याशी चर्चेस तयार आहे. परवा मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाने सन्मानपूर्वक येण्याची विनंती केल्यास पंतप्रधानांच्या भेटीलाही जाऊ अशी सविस्तर भूमिका राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.