लातूर येथील पाणीप्रश्नाचा आढावा घेण्यासाठी आलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे हेलिकॉप्टर औसा तालुक्यातील बेलकुंड येथे उतरावे, म्हणून बनविलेल्या हेलिपॅडसाठी सुमारे १० हजार लिटर पाणी खर्ची पडले. ऐन टंचाईत पाण्याच्या या अपव्ययावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर त्यांच्याकडून पाणी वापराचे समर्थन करण्यात आले.
लातूर शहरातील पाणी टंचाई देशभर गाजते आहे. दररोज लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा होतो. ही रेल्वे सुरू झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. अशा वातावरणात मंत्री खडसे यांनी लातूरचा दौरा केला. जळगाव, मुक्ताईनगरमधून ते लातूर विमानतळावर आले. तेथून विशेष हेलिकॉप्टरने औसा तालुक्यातील बेलकुंड येथे गेले. तेथील पाहणी संपल्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने परत लातूर विमानतळावर आले आणि मुक्ताईनगरकडे मोटारीने रवाना झाले.वास्तविक, लातूर ते बेलकुंड हे अंतर केवळ ४० किलोमीटर आहे. एवढय़ा कमी अंतरासाठी हेलिकॉप्टरचा घाट घालण्यात आला. त्यासाठी १० हजार लिटर पाणी खर्ची घातले. या अनुषंगाने खडसे यांना विचारले असता, मला एवढं पाणी लागेल असेल हे माहीत नाही. हेलिकॉप्टर उतरले तेव्हा धूळ उडत होती. त्यामुळे एवढे पाणी लागले नसेल, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कृतीचे समर्थन केले. लातूर येथे पत्रकार बैठकीत त्यांनी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.