तारापूर परिसरात प्रदूषण वाढल्याचा परिणाम

पालघर/ बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू होताच दांडी-नवापूर खाडीतील मासे मोठय़ा प्रमाणात मृत झाले आहेत. टाळेबंदीदरम्यान कारखाने बंद असल्याने खाडीतील प्रदूषण कमी झाले होते. त्यामुळे या खाडीत मासेमारी केली जात होती. मात्र टाळेबंदीतील नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर तारापूर परिसरात पुन्हा प्रदूषण वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम माशांवर झाला आहे.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अधिकांश उद्योग मार्च महिन्याच्या तिसरा आठवडय़ापासून बंद होते. गेल्या काही दिवसांपासून येथील रासायनिक व टेक्स्टाइल उद्योगांनी आपले उत्पादन सुरू केल्याने सांडपाण्याची निर्मिती वाढली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतींमधून नवापूर येथील समुद्रात ३०० मीटरवर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने भरतीच्या वेळी हे रसायनमिश्रित सांडपाणी खाडीत शिरते. हे सांडपाणी नवापूर-दांडी खाडीमधील पाण्यात मिसळल्याने दीड महिन्यांपासून स्वच्छ असलेल्या खाडीतील पाणी रंगीत झाले आहे. पाण्यामध्ये मिसळलेल्या रसायनांमुळे खाडीमध्ये असलेल्या लहान व मध्यम आकारांच्या बोई माशांसह अनेक प्रजातींचे मासे मृत पडल्याचे दिसून येत आहे. हे मृत मासे खाडीतील पाण्यात तरंगत असल्याचे व नंतर समुद्रकिनारी लागल्याचे दिसून आले.

या प्रजातींचे मासे मृत

बोयमच्छी, कोळंबी, निवटी, नावेरी, कोलिम, शिवल्या, खेकडे, टोड, सरबट, केटफिश, चिमण्या, माडू, शिंगाडी

संचारबंदीत कारखाने बंद असताना दांडी-नवापूर खाडीतील प्रदूषण अतिशय कमी झाले होते. परिणामी टाळेबंदीच्या काळात या ठिकाणी मासेमारी करून मच्छीमार आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र प्रदूषणकारी कारखाने पुन्हा सुरू झाल्याने खाडीत मोठय़ा प्रमाणात मृत मासे दिसून येतात. अनेकदा तक्रारी करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रदूषणकारी कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही.

– कुंदन दवणे, सदस्य, अखिल भारतीय मांगेला समाज परिषद