20 February 2020

News Flash

लातूरमध्ये काँग्रेसला पुन्हा धोक्याचा इशारा

सुधाकर शृंगारे हे काँग्रेसच्या मच्छींद्र कामत यांच्यापेक्षा २ लाख ८९ हजार मते अधिक घेऊन विजयी झाले.

अमित देशमुख

प्रदीप नणंदकर, लातूर

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातील  सहाही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली होती. विधानसभा निवडणुकीसाठी त्यावेळी धोक्याची पहिली घंटा मतदारांनी वाजवली होती. या वेळीही  लोकसभा निवडणुकीतही सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळाली असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससाठी हा इशारा मानला जात आहे.

लातूर जिल्हय़ातील विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची विजयी उमेदवार हा काँग्रेसचाच राहील असे भाकीत कोणताही सामान्य व्यक्ती व्यक्त करू शकत असे.  गेल्या दहा, पंधरा वर्षांत झपाटय़ाने बदल होत असून मतदारांनी आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा मतपेटीतून व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांचा धक्कादायक पराभव भाजपच्या नवख्या श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसचे केवळ विलासराव देशमुख हे एकमेव आमदार निवडून आले होते. निलंगा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील यांनी पराभव केला.

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९च्या निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव झाला. या मतदारसंघात काँग्रेसने कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले. विलासराव देशमुखांमुळे ही किमया घडली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे सुनील गायकवाड २ लाख ३६ हजारपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले व जिल्हय़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्क्य मिळाले. मात्र सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसचे सहापैकी तीन आमदार निवडून आले. त्यात लातूर शहर, ग्रामीण व औसा मतदारसंघांचा समावेश राहिला. उदगीर मतदारसंघात भाजपाचे सुधाकर भालेराव तर निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील विजयी झाले.  लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा भाजपच्या उमेदवारास अधिक मताधिक्क्य मिळालेले असतानाही ते मताधिक्क्य जसेच्या तसे विधानसभा निवडणुकीत भाजपाला टिकवता आले नाही.

२०१९ साली भाजपाचे सुधाकर शृंगारे हे काँग्रेसच्या मच्छींद्र कामत यांच्यापेक्षा २ लाख ८९ हजार मते अधिक घेऊन विजयी झाले. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना मताधिक्क्य मिळाले. लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्हय़ातील आहे. औसा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात असला तरी यावेळी औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला ५१ हजाराइतके प्रचंड मताधिक्क्य मिळाले आहे. मतदारांनी विधानसभा निवडणुकीसाठी वाजवलेली ही दुसरी धोक्याची घंटा आहे. आगामी सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे  मतदान होईल तेव्हा त्याचे चित्र कसे असेल आणि कोणाला कसा व किती फटका बसेल, याची चर्चा मतदारसंघात आताच सुरू झाली आहे. वंचित विकास आघाडीच्या राजकारणाचा कसलाही अनुभव नसलेल्या उमेदवाराने तब्बल १ लाख १२ हजार मते घेतली आहेत.

विधानसभेची तयारी

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार अमित देशमुख हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असतील. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर पडला.  या वेळी  भाजपाने आपला उमेदवार अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे. जिल्हय़ातील औसा व लातूर हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे होते. त्यानंतर औसा शहर मतदारसंघही भाजपाने स्वतकडे घेतला होता. नवीन चच्रेनंतर यापैकी किती मतदारसंघ शिवसेनेकडे जातात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांच्याऐवजी विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे रमेश कराड हे तयारीत आहेत. औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बसवराज पाटील मुरूमकर तिसर्यादा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दिनकर माने राहणार की मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना निवडणुकीत उतरवले जाणार यावरही या मतदारसंघातून कोण निवडून येणार हे ठरणार आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात त्यांचे काका अशोक पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार की नव्याने शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले अभय साळुंके यांना उमेदवारी देण्याचे धाडस काँग्रेस करणार यावर या मतदारसंघातील निवडणुकीची चुरस ठरणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सुधाकर भालेराव हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे हे त्यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडून आलेले विनायकराव पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. भाजपा पुन्हा त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत आहेत मात्र यामुळे त्या मतदारसंघातील भाजपाचे डझनभर जुने कार्यकत्रे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांची बंडखोरी थांबवण्यासाठी भाजपा कोणते उपाय करते हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. बाबासाहेब पाटील पुन्हा एकदा निवडणुकीत उतरतील.

* लातूरमध्ये याआधीच मतदारांनी आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा मतदानातून देण्यास सुरूवात केली आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांचा धक्कादायक पराभव भाजपच्या नवख्या  रूपाताई पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसचे केवळ विलासराव देशमुख हे एकमेव आमदार निवडून आले होते. विलासरावांच्या निधनानंतर लातूरमध्ये कॉंग्रेसची स्थिती बिकट झाली. विलासरावांचा राजकीय वारसा पुत्र अमित यांच्याकडे असला तरी जिल्ह्यात पक्षाकडे कणखर नेतृत्वाचा अभाव आहे.

First Published on May 30, 2019 3:34 am

Web Title: threat for congress after bjp got lead in latur assembly constituency
Next Stories
1 पश्चिम महाराष्ट्रात युतीची मुसंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान
2 ‘वंचित’ला मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा नाहीच!
3 चंद्रपूरमध्ये पारा ४८ अंशांवर
Just Now!
X