‘जनलोकपाल विधेयकासाठी लोकशाही मार्गाचा लढा सोडून द्या, देशात लष्करी राजवटीचा आग्रह धरा, अन्यथा तुमचाही नरेंद्र दाभोलकर करु,’ अशी धमकी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे देण्यात आली आहे. या धमकीच्या पाश्र्वभूमीवर हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी हजारे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हजारे यांना देशभरातून दररोज असंख्य पत्रे येतात. हे पत्र गुरुवारच्या टपालात आले, त्याची वाच्यता शनिवारी झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारे यांच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी त्यासंदर्भात नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनीता जामदार, पारनेर ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांना राळेगणसिद्घीला पाठविले.
जामदार तसेच ढोकले यांनी हजारे वास्तव्य करीत असलेल्या जागेची पाहणी करून आवश्यक तेथे सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात, तसेच हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. हजारे शनिवारी सायंकाळी राळेगणसिद्घीत पोचले असून, तत्पुर्वीच येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
 ‘तुमच्या मरणानंतरही राजकारणी जनलोकपाल विधेयक मंजूर करणार नाहीत, त्यासाठी लोकशाही मार्ग सोडून देशात लष्करी राजवटीची मागणी करा, त्याशिवाय राजकारणी सरळ होणार नाहीत. तुम्ही हे न केल्यास तुमचाही नरेंद्र दाभोलकर करु,’ अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.
हजारे यांना आलेल्या या धमकीचा राळेगणसिद्घी परिवाराने निषेध केला असून, अशा भ्याड धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे सरपंच जयसिंग मापारी यांनी म्हटले आहे. ज्यांना धमकी द्यायची, त्यांनी नावानिशी द्यावी, त्यांच्याशी दोन हात करण्यास आम्ही सक्षम आहोत. यापूर्वी अण्णांना मारण्यासाठी सुपाऱ्या देण्यात आल्या, हल्लेही झाले, मात्र हजारे यांनी त्याचा खंबीरपणे मुकाबला केल्याचे मापारी यांनी सांगितले.

राळेगणसिध्दीहूनच पत्र पाठविले!
धमकीच्या या पत्रावरील टपाल कार्यालयाचा शिक्का अत्यंत अस्पष्ट आहे. साध्या नजरेने त्याचा तपशील दिसत नाही. मात्र, हे पत्र राळेगणसिध्दी येथूनच पाठवण्यात आल्याचे एव्हाना त्या शिक्क्य़ावरून स्पष्ट झाले आहे. नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. ‘पत्र पाठवणाऱ्याचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. स्थानिक टपाल कार्यालयातूनचे हे पत्र पाठवले गेल्याचे स्पष्ट झाल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे,’ असे ते म्हणाले.