लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : टाळेबंदीच्या काळात रस्त्यावर खेळणाऱ्या तरुणाला हटकल्याने त्याने पोलिसांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा अकोट शहरातील धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ताज शरीफ राणा (३० रा. कांगारपुरा, अकोट) असे या आरोपीचे नाव आहे.

अकोट शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना काही युवकांनी शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली. अकोट शहरातील शौकत अली चौकात तैनात असलेल्या पोलिसांनी टाळेबंदी असतांना बाहेर खेळणाऱ्या काही युवकांना हटकले. त्यावर तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांना शिवीगाळ करत तरुणांनी पुन्हा या भागात दिसला तर थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे चित्रफितमध्ये दिसत आहे.

या घटनेची चौकशी केली असता धारोळीवेस चौकी जवळील ही चित्रफित १७ मे रोजीची असल्याचे उघड झाले. टाळेबंदी असताना मोठ्या संख्येने या ठिकाणी जमाव झाल्याचे दिसून येते. आरोपी ताज शरीफ राणा हा एएसआय राऊत, पोकॉ वरोठे, हेपोकॉ डामरे यांना अश्लिल शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसत आहे. १७ मे रोजी पोलीस धारूळवेस भागात पेट्रोलिंग करतांना हा प्रकार घडला. या प्रकरणी अकोट शहर पोलीस निरीक्षण संतोष महल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीस ठाण्यात आरोपी ताज शरीफ राणाविरूद्ध भादंवी कलम २६९, २९४, ५०४, ५०६, १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.