News Flash

अजित पवारांची बोर्डीकरांना धमकी

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने प्रयत्न करीत असताना सत्ताधारी काँग्रेसच्या आमदाराने परभणीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली नाही. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख याचे साक्षीदार आहेत.

| April 14, 2014 02:19 am

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने प्रयत्न करीत असताना सत्ताधारी काँग्रेसच्या आमदाराने परभणीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली नाही. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख याचे साक्षीदार आहेत. विधानसभेच्या वेळी मीही बघून घेईल, अशी जाहीर धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे नाव न घेता दिली.
आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ पवार यांची जाहीर सभा जिंतूरला झाली. राज्यमंत्री फौजिया खान, उमेदवार भांबळे, सुरेश वरपुडकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस, खासदार गणेश दुधगावकर, तुकाराम रेंगे, अॅड. प्रताप बांगर, स्वराज परिहार आदी उपस्थित होते.
राज्यात सर्वत्र आघाडीस चांगले वातावरण असताना या वातावरणाला दृष्ट लागू देऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी कोणी चार-दोनजणांनी गडबड केली तर आम्ही त्यांना भिक घालणार नाही. पाचजण एकत्र आल्यानंतर त्यांनी स्वतला पांडव असे संबोधले. त्यांच्यात आता सहाव्या मेटेंचा समावेश झाला. मेटेंना मंत्री व्हायचे होते. बीडमध्ये दोन मंत्री व मोठय़ा संख्येने आमदार असताना मेटे यांना मंत्री कसे करणार? स्वतच्या स्वार्थासाठी त्यांनी आपली शिवसंग्राम संघटनाच दावणीला बांधली. असा आरोप पवार यांनी केला. स्वतच्या जिल्ह्याचा जे लोक कायापालट करूशकले नाहीत, ते स्वतला राष्ट्रीय नेते म्हणवतात, असा टोलाही त्यांनी मुंडे यांना लगावला.
जिल्ह्यात गोदावरी पात्रात बंधारे बांधल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला. केंद्रात व राज्यात आघाडी सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला. त्याचा गोरगरिबांना फायदा झाला. शिवसेनेचे नेतृत्व शहरी आहे. त्यांना ग्रामीण भागातले प्रश्नच कळत नाहीत. महाराष्ट्रात इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक साकारले जाईल. कोल्हापुरातही शाहू स्मारक उभारले जाणार आहे. राज्यातल्या सर्व घटकांची काळजी घेतली जाईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिले जावे, अशी आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. सभेत पवार यांनी महायुतीचे उमेदवार जाधव यांच्यावरही नाव न घेता टीका केली. सवाईराम जाधव, दुर्राणी, सारंगधर महाराज, तुकाराम रेंगे, सुरेश देशमुख, सुरेश धस, उमेदवार भांबळे आदींची भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:19 am

Web Title: threaten to ramprasad bordikar by ajit pawar 3
Next Stories
1 निवडणूक खर्चाच्या ‘खेळा’त उमेदवारांचा अवमेळ!
2 विखे यांचे ठाकरे यांना प्रत्युत्तर
3 राज्यभरातून आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून इतिहासाची पुनरावृत्ती करा- अजित पवार
Just Now!
X