भंडारद-याच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न पंधरा दिवसांत मार्गी न लागल्यास भंडारदरा धरणाचे चाक बंद करण्याचा इशारा आज वारंघुशी फाटा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तालुक्यात झालेल्या सर्वच कामाची व आलेल्या निधीची चौकशी करण्यासाठी या विभागाच्या संगमनेर येथील कार्यालयास प्रसंगी कुलूप ठोकावे लागेल असे या वेळी बजावण्यात आले.
भंडारदरा या पर्यटनस्थळाकडे जाणा-या वारंघुशी, भंडारदरा, गुहिरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. घाटघर प्रकल्पाच्या वेळी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पाचसहा वर्षांपूर्वी घाटघर प्रकल्पाचे काम संपले आणि या रस्त्याचे नष्टचर्य सुरू झाले. या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी वारंघुशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेंडी (भंडारदरा) येथे बंद पाळण्यात आला.
या वेळी वक्त्यांनी तालुक्यातील सत्ताधा-यांवर कडक शब्दांत टीका केली. रस्ता, वीज, पाणी यासारख्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांमध्येही राजकारण आणून जनतेला वेठीस धरण्याचे काम आजी-माजी आमदार करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी यावेळी केला. जि. प. सदस्य किरण लहामटे यांनी विरोधी कार्यकर्त्यांच्या गावात रस्ते होऊ द्यायचे नाही असे कुटील राजकारण सध्या तालुक्यात सुरु असल्याची टीका केली. तालुक्यातील एका विशिष्ट ठेकेदाराने केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर वाकचौरे यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. लोळगे यांनी वाकी ते भंडारदरा रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले, तसेच वारंघुशी ते रंधा या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन तेही काम मार्गी लावण्याची ग्वाही दिली, मात्र उपस्थितांनी त्यांचेकडे लेखी द्या अशी मागणी करत त्यांना घेराव घातला. मात्र अखेर भांगरे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.