News Flash

ऑनलाईन वृत्तवाहिनीच्या संपादकास जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी युवक काँगेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांना सुमारे दहा ते बारा जणांनी त्यांच्या घरात जाऊन मारहाण केली. तसेच गाडीचे नुकसान करून घरच्यांनाही धक्काबुक्की केली.

| July 7, 2014 04:00 am

राष्ट्रवादी युवक काँगेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांना सुमारे दहा ते बारा जणांनी त्यांच्या घरात जाऊन मारहाण केली. तसेच गाडीचे नुकसान करून घरच्यांनाही धक्काबुक्की केली. या बाबत निंबाळकर यांनी फलटण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान ज्या बाबतीत एका प्रसिध्दीपत्रकावरून हा प्रकार घडला त्या ऑनलाईन वृत्तवाहिनीच्या संपादकासही अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याची नोंद सातारा येथे करण्यात आली आहे.
सातारा येथील ऑनलाईन वृत्त वाहिनीवरून नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबद्दल बातमी दिली होती.त्यात रामराजेंनी जनतेला ‘नो उल्लू बनाविंग’ अशी टीका केली होती. सुशांत निंबाळकर यांनी ही बातमी फेसबुकवर आवडल्याची प्रतिक्रिया देत पुढे पाठवल्याचा राग मनात धरून फलटण येथील त्यांच्या घरी दहा ते बारा जणांचा जमाव गेला. सुशांत निंबाळकर यांना दमदाटी करून तसेच त्यांच्या आई-वडिलांना आणि पत्नीला धक्काबुक्की करत निंबाळकर यांच्या गाडीचीही या मंडळींनी तोडफोड केली. निंबाळकर यांनी सनी अहिवळे, किशोर पवार, धनराज पवार, सलीम शेख, अभिजित जानकर, राजू बोके, सिध्दार्थ अहिवळे यांच्यासह इतरांविरुध्द तक्रार केली आहे.
दरम्यान, ज्या वृत्तवाहिनीवर हे वृत्त प्रसिध्द झाले त्याचे संपादक संग्राम निकाळजे यांना दोन युवकांनी सातारा येथे रामराजे यांच्या विरोधात बातम्या का देतोस, असे धमकावत रिव्हॉल्व्हरची भीती दाखवली. निकाळजे यांनीही सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेनंतर रामराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन, मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,असे सांगून, गेली १२ वर्षे मी राजकारण करत आहे, ते शांततेच्या मार्गाने केले आहे. असे प्रकार करण्याची मला गरज नाही, असे सांगून, जी मंडळी दोषी असतील त्यांवर पोलिस कारवाई करतील अशी प्रतिक्रिया दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 4:00 am

Web Title: threatened to kill online news channel editor
टॅग : Satara
Next Stories
1 भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये- रामदास कदम
2 कारवाईचा इशारा न जुमानण्याचा संपकरी डॉक्टरांचा निर्णय
3 ‘अच्छे नही, बुरे दिनों की शुरुवात’
Just Now!
X