‘संग्रामभैयांच्या विरोधात उमेदवारी मागशील तर तुला कायमचा संपवून टाकू, याद राख’ अशी धमकी दोघांनी दिल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी यासंदर्भात भादंवि ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद केली आहे. महापौर तथा राष्ट्रवादीचेच शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, सचिन जगताप व आ. अरुण जगताप यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याची लेखी तक्रार उद्या (बुधवार) आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करणार असल्याचे काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना भूतकरवाडीतील हनुमान मंदिरासमोर असलेल्या काळे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. क्रमांक नसलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून दोघे तेथे आले, पुढे बसलेल्याने हेल्मेट तर मागे बसलेल्याने तोंडाला रुमाल लावला होता, त्यांनी आपल्याला धमकी दिली, आपण प्रत्युत्तर देण्याचा व त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघे सुसाट वेगाने निघून गेले. नंतर आपण ही घटना पोलिसांना कळवली व त्याच्या सूचनेप्रमाणे तक्रार दाखल केली, असे काळे यांनी सांगितले.
यापूर्वीही महापौर जगताप यांना गाडगीळ पटांगणातील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न व आपल्या उमेदवारीच्या मागणीस त्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून ६ ऑगस्टला भेटण्यास गेलो होतो. त्या वेळीही त्यांनी आपल्याला उडवून लावत, बोलण्यास नकार देत, त्यांचे त्या वेळी अत्यंत आक्रमक व संतप्त रूप आपल्याला पाहावयास मिळाले. तेथे उपस्थित असलेले जगताप यांचे कार्यकर्ते जितू गंभीर यांनीही आपल्याला दमदाटी करून धमकावण्याचा प्रयत्न केला, ही घटना आपण खासदार सुप्रिया सुळे व युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या निदर्शनास आणल्याचे काळे यांनी सांगितले.
पक्षात लोकशाही असल्याने उमेदवारी मागण्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित करत काळे म्हणाले, की शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची दहशत नाही तर काही व्यक्तींची आहे. या अतिरेकाचा एक दिवस उद्रेक होईलच, पक्ष काही संग्राम किंवा अरुण जगताप यांचा नाही. शहरात शांतता हवी असली तरी विकासाची निष्क्रियता ही नगरकरांची फसवणूकच आहे, असे काळे म्हणाले.
‘मी काय उत्तर देणार?’
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात महापौर संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता जगताप यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले, मी काय उत्तर देणार? काळे म्हणतात तसे खरेच घडले का, त्यांचे हे कशासाठी चालले आहे, हे सर्वांना माहीत आहे.