ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासे येथील अंबादास लष्करे या व्यक्तिने सहाव्यांदा धमकीचे पत्र पाठवले आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्या विरोधातील खठला मागे घेण्यासाठी आपण किती पैसे घेतले, आपण भ्रष्टाचारी आहात असा आरोप राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील हजारे यांच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या पत्रात करण्यात आला आहे.
या पत्रातील मजकुर पुढीलप्रमाणे आहे, अण्णा आपण खुप ढोंगी, स्वार्थी आहात, आजारपणाचे नाटक करता, जळगाव येथील सुरेश जैन यांच्या विरूद्धची केस मागे घेण्यासाठी किती कोटी रूपये घेतले आहेत? आपण किती भ्रष्ट्राचारी आहात? मध्यंतरी आपण आजारपणाचे नाटक केले. आम्हाला असे वाटले की, आपण मरताल, देवाने तुम्हाला वाचविले, आपण नोबेलला अ‍ॅडमिट झाले, डॉ. कांडेकर तपासले, आपण नॉर्मल असे डॉक्टरांनी जाहिर केले, पण ऐवढे लक्षात ठेवा आपण दुखण्याचे नाटक केले. आज ना उद्या तुम्ही आमच्या हाताने मरणार आहात, अण्णा आपण प्रसिद्धीसाठी स्टंट केला, आपण सरकारी योजना तसेच सरकारी नोकरांना बाहुले बनविले, आपण आपला वारस अजून निवडला नाही, आपण मेल्यानंतर सगळी इस्टेट आपण कुणाच्या नावे करणार आहात? आपण हे पत्र मिळताच जाहिर करावे.
आपण म्हणता मी स्वातंत्र सैनिक आहे, आपण किती वर्षे मिलीट्रीमध्ये काढली? आपण पळून आले आहात, आपण पळपुटे आहात, आपण नामर्द आहात, आपण जनलेला खोटे सांगत आहात, आपले हे जास्त दिवस टिकणार नाही, आपण जर देवाच्या मौतीने गेला तर आम्ही घेतलेले ५० लाख रूपये नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदीरामध्ये टाकून देउ, दान करू. आपण पांढरे कपडे घातले आहेत, परंतू आपले मन काळे आहे, पाखंडी आहे, धोंडू आहे. आपला कितीही बंदोबस्त ठेवला तर आपण आमची शिकार होणार आहात, इंदिरा गांधी यांना जशा गोळया घातल्या तशा गोळयाने आपण मरणार आहात, पोलिस आमचे काहीही वाकडे करणार नाहीत, वारस जाहिर करणे, आपण किती संपत्ती गोळा केली याचा उल्लेख करणे, बँक बॅलंस तसेच सोने नाणेचा उल्लेख करणे. आपला सगळा उतारा कोरा करणे. आपला – अंबादास चिमाजी लष्करे (मो. ९६६५६०२६५४, पांडे मिस्तरी, नारायण मापारी एटीएम नेवासा ७३८७२६४६०५, काळूराम ज्ञानेश्वर पीटेकर नेवासा, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
या पत्राच्या सुरूवातीला मध्यभागी वृत्तपत्रातील ‘जैन यांच्या विरूद्धचा खटला माणुसकीच्या भावनेतून मागे’ या बातमीचे कात्रण जोडलेले आहे. पाकिटावर नेवासा पोष्टाचा शिक्का असून त्यावर १५ मे २०१६ तारीख आहे. पाकिटाच्या मागील बाजूस नगर टपाल कार्यालयाचा शिक्का, त्यावर दि. १३ आहे. समोरील बाजूस राळेगणसिद्धी टपाल कार्यालयाचा दि. १४ चा शिक्का आहे.
पोलिसांनी धमकी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेउन आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी हजारे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. स्वत: हजारे हे अशा धमक्यांना कधीही घाबरत नाहीत, याशिवाय सरकारने त्यांना झेड सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही सुरक्षा अधिक कडक करण्यात आलेली आहे. असे असले तरी आण्णांना वारंवार धमक्या येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. गेल्या ३३ महिन्यात १५ वेळा गंभीर स्वरूपाच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. गेल्या ८ महिन्यात नेवासे येथून अंबादास लष्करे या नावाने सलग ५ वेळा धमकीचे पत्र आले आहे. मात्र धमकीचे पत्र लिहणारा अरोपी सापडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे.
कदाचित पोलिस त्याच्यापर्यंत पोहचू शकत नसल्यामुळे आरोपीचे धाडस वाढले असावे, असे या पत्रावरून दिसते. या धमकी प्रकरणाचा आपण गांभिर्याने विचार करून या आरोपीस जेरबंद करून कठोर कारवाई करावी त्यामुळे आशा धमक्यांचे प्रकार बंद होतील, असे हजारे समर्थकांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.