उस्मानाबाद येथे होणाऱ्या नियोजित ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे वृत्त आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याप्रकरणी बोलताना ठाले पाटील म्हणाले, “आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत ही खरी बाब आहे. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करणारे मला स्वतःला २० ते २५ फो फोन येऊन गेले आहेत. तर आणखी काही अनोळखी मिस्ड कॉलही आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त फोन हे ठाणे, कल्याण, मुंबई येथून आले आहेत. आम्ही तुमचा दुर्योधन करु, तुम्हाला पाहून घेऊ अशा प्रकारे धमक्या फोनमधून देण्यात आल्या आहेत. मात्र, अशा धमक्यांना न घाबरता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.” एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

फादर दिब्रिटो यांची निवड करण्याचा निर्णय एकट्या दुकट्याने घेतलेला नाही तो एकमताने झाला आहे. दिब्रिटो यांच्या निवडीनंतर मराठीतील सर्व माध्यमांसह मान्यवरांनी याचे स्वागत केले आहे. विकास आमटेंनीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिब्रिटो यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला येत असलेल्या फोनकडे आम्ही पाहतो. माझ्यासह पुण्यातील साहित्य महामंडळाचे पदाधिकारी प्रा. मिलिंद जोशी यांनाही अशा प्रकारे धमक्यांचे फोन आले आहेत. तसेच मुंबईच्या प्राध्यापिका उषा तांबे यांचाही मला फोन आला होता, मात्र त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे होऊ शकले नाही. या फोनमधून अनेकांनी दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध दर्शवला मात्र, यांपैकी दोन जणांनी माझ्याशी चढ्या आवाजात बातचीत केली. यांपैकी सत्यजित देशमुख यांचा आवाज चढला होता. तर एका तरुणाने मला मेसेज पाठवत तुम्हाला पाहून घेऊ अशा स्वरुपाची धमकी दिली आहे, असेही ठाले पाटील यांनी सांगितले आहे.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील वर्षी जानेवारी महिन्यांत उस्मानाबद येथे होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांसह संलग्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.