नागपुरातील पोलीस लाईन टाकळी भागात एका पोलिसावर हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यामधला एक जण पोलीस शिपायाचा मुलगा असल्याचंही स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी गिट्टी खदान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. आता याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अनिल चक्रे असे जखमी पोलिसाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चक्रे हे पोलीस मुख्यालयात हेडकॉन्स्टेबल आहेत. शुक्रवारी रात्री कर्तव्य बजावून चक्रे घरी जात होते.

पोलीस लाईन टाकळी भागात प्रफुल्ल राठोड व त्याचे मित्र बोलत होते.चक्रे प्रफुल्ल यांच्याजवळ थांबले.तेही प्रफुल्ल सोबत बोलावयला लागले.याचदरम्यान काही अंतरावर अनोळखी युवक संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे चक्रे यांना दिसले. चक्रे तिथे गेले आणि त्यांना हटकले. दोघांनी चक्रे यांच्यासोबत वाद घातला. त्यांना मारहाण केली. प्रफुल्ल राठोड हे चक्रे यांच्या मदतीसाठी धावले. तेव्हा अनोळखी तरुणांनी प्रफुल्ल यांना शिवीगाळ केली. त्यांच्या मागे धावले. प्रफुल्ल तेथून पळाले.

त्यानंतर दोघांनी चक्रे यांना पुन्हा मारहाण केली. चक्रे खाली पडले. या तरुणांनी चक्रे यांच्या अंगावरून मोटरसायकल नेली व पसार झाले. चक्रे जखमी झाले. प्रफुल्ल यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस स्टेशनचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी चक्रे यांना रवीनगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आता तिघांना जेरबंद करण्यात आलं आहे.