करोना टाळेबंदीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघिण व तिच्या दोन बछड्यांची पाण्यातून विष देऊन शिकार केल्याप्रकरणी कोंडेगाव येथील तीन ग्रामस्थांना ताडोबा व्यवस्थापणाने ताब्यात घेतले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या शिकारप्रकरणाची वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

जगप्रसिद्ध ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्प करोना टाळेबंदीत पूर्णतः बंद आहे. अशातच १० जून रोजी कोंडेगाव-सीतारामपेठ येथील एका तळ्यावर वाघीण मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर चार दिवसांनी १४ जून रोजी वाघिणीचे दोन बछडे व दोन माकडांचा मृतदेह देखील कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

दरम्यान, एकाच वेळी वाघीण, दोन बछडे आणि माकडांचा मृत्यू झाल्याने नक्की काहीतरी गडबड असल्याचा संशय वनखात्याला आला होता. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापणाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरू केली होती. वाघीण, बछडे व माकडांचे अवयव हैद्राबाद येथील प्रयोगशाळात तपासणीसाठी पाठवण्यात आले. दरम्यान, ताडोबा बफर झोनचे उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व कोंडेगाव येथील तीन ग्रामस्थांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले.

याप्रकरणी अधिक माहितीसाठी उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता या शिकारप्रकरणी चौकशीसाठी ग्रामस्थांना ताब्यात घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.