मुख्यमंत्री उध्दव उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील  भिलवले येथील फार्म हाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खालापूर तालुक्यातील भिलवले येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वडिलोपार्जीत फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तीन ते चार जण प्रवासी कारमधून येऊन रेकी करत होते. सुरक्षा रक्षकाकडे ठाकरे यांचा फार्म हाऊस कुठे आहे? अशी विचारणाही केली. मात्र सुरक्षा रक्षकाला संशय आल्याने त्याने माहिती देण्यास नकार दिला. थोड्यावेळानी पुन्हा हे तिघं मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसमध्ये दाखल झाले. सुरक्षा रक्षकाशी माहिती का दिली नाहीस? असे म्हणत हुज्जत घालू लागले. तसेच, शिवीगाळी करून त्याला धक्काबुक्की देखील केली व ते निघून गेले. यानंतर सुरक्षा रक्षकाने ही बाब तातडीने पोलीसांना कळवली.

पोलीसांनी तातडीने या तिघांचा शोध सुरु केला. मध्यरात्री तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. अनुज कुमार, यशपाल सिंग आणि प्रदिप धनावडे अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५२. ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक काईंगडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.