महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द ठरणाऱ्या तेरेखोल खाडीत अनधिकृत वाळू उपसा होत असल्याने या खाडीपात्रावरील आंतरराज्य वाहतूक होणाऱ्या तीन पुलांना धोका संभविण्याची भीती बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यावर र्निबध आणले जाण्याची मागणी आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्य जोडणाऱ्या आरोंदा किरणपाणी, सातार्डा पाटोपूल आणि सातार्डा कोकण रेल्वे पूल आहेत. हे आंतरराज्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे पूल मानले जातात.
या दोन्ही राज्य जोडणाऱ्या तेरेखोल खाडी पात्रात गोवा राज्यातील वाळू व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात उत्खनन करतात. सिंधुदुर्गात वाळू उत्खनन व तस्करीवर र्निबध आणण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असतानाच तेरेखोल खाडी मात्र गोवा राज्यातील वाळू व्यावसायिकांना आंदण दिल्यासारखाच प्रशासनाचा थाट आहे.
या तेरेखोल खाडी पात्राचे क्षेत्र महाराष्ट्र व गोवा राज्याची हद्द ठरविणारे आहे, पण दोन्ही राज्यांनी सीमांकन केलेले नसल्याने अनधिकृत वाळू उपसा रोखणे अवघड होऊन बसले आहे. वाळू उपसा रोखण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी यापूर्वी प्रयत्नही केले. त्या वेळी हल्लेही झाले आहेत. तसेच अनधिकृत वाळू उपसा केली म्हणून दंडाची कारवाईदेखील झाली आहे.
आरोंदा किरणपाणी, सातार्डा पाटो आणि सातार्डा रेल्वे पुलाजवळ वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे पुलाच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे सांगण्यात येते. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी चार वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी यांना पुलापासून किमान पाचशे मीटपर्यंत वाळू उत्खनन केले जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे कळविले होते,
गोवा राज्यातील वाळू व्यावसायिक अवैधरीत्या घुसखोरी करून वाळू उपसा करीत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र व गोवा सरकार कारवाई करीत नाहीत, तसेच या तेरेखोल खाडीचे सीमांकनही झालेले नसल्याने दोन्ही राज्यांतील प्रशासने कठोर भूमिका घेत नाहीत, असे सांगण्यात येते.
या तेरेखोल खाडी पात्रात दळणवळणाची मुख्य साधने असणाऱ्या या तिन्ही प्रमुख पुलांना धोका पोहोचू नये म्हणून महाराष्ट्र व गोवा राज्य सरकारने जलदगतीने पावले टाकावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.