देशभर गाजत असलेल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत नागपूरसह देशातील चार प्रमुख शहरांमध्ये सीबीआयच्या विविध पथकांनी गुरुवारी एकाचवेळी झडती सुरू केली.
कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडला २००३ मध्ये किलोनी, मनोरा दीप व बरंज तेथे चार, अशा एकूण सहा कोळसा खाणी वितरित करण्यात आल्या होत्या. विनापरवानगी संयुक्त कंपनी स्थापन करून तसेच खासगी कंपनीसोबत भागीदारी व अशुद्ध कोळसा पुरवठा संबंधीचा व्यवहार दडवून ठेवून फसवणूक व गैरव्यवहार केल्याप्रकरणी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड, बंगळुरू व नागपूरस्थित कोल फिल्ड्स अँड वॉशरीज लिमिटेड या कंपन्यांच्या अनोळखी संचालक व भागीदारांविरुद्ध फसवणूक तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा सीबीआयने दिल्लीत दाखल केला. कोळसा खाण घोटाळा प्रकरणातील हा ३९ वा गुन्हा आहे. परवानगी नसतानाही कोल वॉशरीजमध्ये गुंतलेल्या खासगी क्षेत्रातील कंपनीला लाभ मिळवून देऊन कोळसा मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन केले गेले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्लीत गुन्हा दाखल केल्यानंतर सीबींआयच्या विविध पथकांनी  एकाचवेळी झडती सुरू केली. नागपुरात सिव्हिल लाईन्समधील कार्यालयासह तीन-चार ठिकाणी सकाळी एकाचवेळी विविध पथके धडकली व त्यांनी झडती सुरू केली. या झडतीचा अधिकृत तपशील उपलब्ध झाला नसला तरी कोळसा खाण व्यवहार, कोळसा पुरवठा, खरेदी-विक्री व्यवहार, लेखे, बँकांमधील खाती, कंपनी व्यवहारआदी  कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.