लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील करोना तपासणीचे १९ अहवाल आज, शुक्रवारी नकारात्मक आले. जिल्ह्यातील आणखी १०३ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तीन रुग्णांनी करोनावर मात केल्याने सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १९ अहवाल आज प्राप्त झाले. ते सर्व नकारात्मक आले आहेत. जिल्ह्याात आतापर्यंत एकूण ५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत ३२ जणांनी करोनावर मात केली. सध्या रुग्णालयात २१ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण १०७२ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली. खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या तीन रुग्णांना आज सायंकाळी सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा येथील २० वर्षीय युवक, जळका भडंग येथील २५ वर्षीय पुरुष व गोपाळ नगर खामगाव येथील ६० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 29, 2020 10:14 pm