लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : फिलीपीन्स येथून बुलडाणा शहरात आलेल्या युवकासह जिल्ह्यातील तीन जणांचा करोना तपासणी अहवाल आज, गुरुवारी सकारात्मक आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ५३ वर पोहोचली. ३८ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४१ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये ३८ अहवाल नकारात्मक, तर तीन अहवाल सकारात्मक आले आहेत. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये बुलढाणा शहरातील रायगड कॉलनी येथील २४ वर्षीय तरुण, मोताळा तालुक्यातील सावरगांव जहाँ येथील ३५ वर्षीय पुरुष आणि नांदुरा तालुक्यातील येरळी येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सावरगांव जहाँ व येरळी येथील रुग्णांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. येरळी येथील रुग्णाला नांदुरा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात विलगीकरण करण्यात आले होते. बुलडाणा शहरातील तरुण फिलीपीन्स येथून आलेला आहे.दरम्यान, नांदुरा तालुक्यातील आव्हा येथील एका २४ वर्षीय रुग्णामध्ये मागील दहा दिवसांपासून करोनाची कुठलेही लक्षणे नसल्यामुळे आज रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २९ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २१ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ९१ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण १०५३ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर.जी. पुरी यांनी दिली.