लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील आणखी तीन जणांचा करोना तपासणी अहवाल बुधवारी रात्री सकारात्मक आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३५ झाली आहे. गुरुवारी प्राप्त झालेले सर्व २४ अहवाल नकारात्मक आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल एकाच दिवसांत नव्या पाच करोनाबाधित रुग्णांची भर पडली. सकाळच्या अहवालात दोन करोनाबाधित आढळून आले. सायंकाळच्या अहवालात त्यात आणखी तीन रुग्णांची वाढ झाली. बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काल रात्री तीन अहवाल सकारात्मक प्राप्त झाले आहेत.

नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील १९ वर्षीय तरुण, खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील २५ वर्षीय तरुण आणि खामगावातील गोपाळ नगर येथील ७० वर्षीय वृद्धाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या रूग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज २४ अहवाल प्राप्त झाले आहेत. ते सर्व नकारात्मक आले आहेत. जिल्ह्यातील आणखी ९४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ८२० अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.